Fri, Jun 05, 2020 02:13होमपेज › Marathwada › विधान परिषदेसाठी ९९.६० टक्के मतदान

विधान परिषदेसाठी ९९.६० टक्के मतदान

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 10:18PMपरभणी / हिंगोली ः प्रतिनिधी

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार दि.21 मे रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकूण 501 मतदारांपैकी 499 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 99.60 टक्के मतदान झाले. हिंगोलीतील दोन मतदारांनी मतदान केले नाही तर परभणीच्या केंद्रावर अचानक मतदारांची संख्या वाढली आणि मतदानाची वेळ संपत आल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या परवानगीने त्यांना वेळ वाढवून देण्यात आली. 

परभणी जिल्ह्यातील परभणी,  सेलू, गंगाखेड, पाथरी, तहसील कार्यालयात तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर दुपारी 4 वाजेपर्यंत 100 टक्के मतदान झाले असून हिंगोली तहसील कार्यालय या मतदान केंद्रात 98.17 टक्के मतदान झाले आहे. हिगोली जिल्ह्यातील 3 केंद्रांवर 177 जणांचे मतदान  झाले. हिंगोलीतील मतदान केंद्रावर 179 पैकी 177 जणांचे मतदान झाले.  कळमनुरी मतदान केंद्रावर 19 पैकी 19  आणि वसमत मतदान केंद्रावर 51 पैकी 51 जणांनी मतदान केले. 2 मतदारांनी मतदान केले नाही, ते कोण आहेत? याचीच चर्चा सुरू आहे. सेलू येथे 54 पैकी 54, गंगाखेडात 70 पैकी 70, पाथरीत 65 पैकी 65 जणांनी मतदान केले. 

परभणी केंद्रावर दुपारी चारनंतरही मतदान

परभणी येथील केंद्रावर 133 पैकी 133 मतदारांनी मतदान केले. दुपारी 4 वाजता मतदानाची वेळ संपण्यापूर्वी अचानक मतदारांची संख्या वाढल्याने निवडणूक यंत्रणेचा काहीसा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान केंदाच्या आत प्रवेश केलेल्यांचे मतदान पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांत मतदारांनी हक्क बजावला असून कळमनुरी, वसमत येथील मतदार केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत एकही मतदार फिरकला नव्हता. तसेच इतर केंद्रांवरही सुरुवातीला मतदानाचा वेग खूपच कमी होता. सकाळी 10 वाजेपर्यंत 7 केंद्रांवर मिळून केवळ 5 जणांनी मतदान केले होते. गंगाखेड, पाथरी, सेलू, केंद्रांवर एकही मतदार सकाळी दहा वाजेपर्यंत फिरकला नव्हता. मतदारसंघात पहिल्या दोन तासांत केवळ 1.72 टक्के मतदानाची नोंद झाली. वास्तविक सकाळी दहा वाजल्यानंतर मतदानाची गती वाढली.

दिग्गजांचेही मतदान

परभणीत येथे तहसील कार्यालयाच्या केंद्रावर दिग्गजांनी मतदान केले. महापौर मीनाताई वरपुडकर, उपमहापौर माजू लाला, गटनेते भगवान वाघमारे, स्थायी समिती सभापती गणेश देशमुख, विजय जामकर, दादासाहेब टेंगसे, गुलमीर खान, बाळासाहेब रेंगे, सचिन देशमुख, गणेश घाटगे, अनिल नखाते,  परभणी  बाजार समितीचे सभापती समशेर वरपुडकर यांनी एकत्रित मतदान केले. दरम्यान, उमेदवार सुरेश देशमुख, माजीमंत्री सुरेश वरपुडकर, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग यांनी केंद्रास भेट दिली. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील, अकोल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया, डॉ. विवेक नावंदर, बाळराजे तळेकर, प्रभाकर वाघीकर, राम पाटील खराबे, गणेशराव रोकडे, विष्णू मांडे, नगरसेवक अतुल सरोदे, चंदू शिंदे, रवी पतंगे, आनंद भरोसे, नितेश देशमुख, अमरदीप रोडे, व्यंकटराव शिंदे तसेच युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांनीही मतदान केंद्रास भेट दिली. 

गुरुवारी सकाळी मतमोजणी

सातही मतदान केंद्रांवरील मतपेट्या परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. त्या ठिकाणी तयार केलेल्या स्ट्राँग रूममध्ये या मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात येणार असून तेथे चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 24 मे रोजी सकाळी मतमोजणी होेणार आहे. त्यानंतर लगेचच या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. 

सेलूत 100 टक्के मतदानसेलू : येथे तहसील कार्यालयाच्या इमारतीत मतदान केंद्र क्रमांक 2 वर शंभर टक्के मतदान झाले.  जिंतूर व सेलू येथील नगरपालिका सदस्य व पंचायत समिती सभापती असे एकूण 54 मतदार होते. शहरातील तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतदान केंद्र उभारण्यात आले होते. केंद्रप्रमुख म्हणून तहसीलदार स्वरूप कंकाळ व त्यांना सहायक म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी काम पाहिले. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक बळवंत जमादार यांच्यासह उपनिरीक्षक शंकर पांढरे व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.