होमपेज › Marathwada › ९ हजार कामगारांना ५ लाख रुपयांचा अपघात विमा

९ हजार कामगारांना ५ लाख रुपयांचा अपघात विमा

Published On: Jun 01 2018 2:07AM | Last Updated: May 31 2018 10:54PMपरभणी : प्रतिनिधी

प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेच्या माध्यमातून  शहरातील 9 हजार पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपये वार्षिक विमा देण्यात येणार आहे. यासाठी शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामुळे शासनाने निश्‍चित केलेल्या यादीत नाव समाविष्ट असणार्‍या नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

शहरातील कष्टकरी, सफाई कामगार, कचरा वेचक, दुकानांमध्ये काम करणारे कामगारांच्या आरोग्यासाठी शासनाने प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शहरातील लाभार्थ्यांना व्हावा यासाठी 2011 च्या जनगणनेनुसार 9 हजार कुटुंबांची निवड झाली. याकरिता शहर महानगरपालिकेने 25 मे पासून शहरात शासनाच्या यादीत समाविष्ट लोकांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे.

शहरातील 57 प्रभागांमध्ये असलेल्या लाभार्थ्यांची माहिती मिळवण्याकरिता मनपाच्या आरोग्य विभागातील डॉ. आरती देऊळकर यांची जिल्हास्तरीय सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्‍ती केली आहे. तसेच आरोग्य संस्थास्तरीय नियंत्रण अधिकारी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सावंत, डॉ. नीलेश पवार, डॉ. कल्पना आळणे, डॉ. दीपा भेटे यांची नियुक्‍ती केली आहे. प्रत्यक्षपणे नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी 30 ए.एन.एम. नोडल अधिकारी व 58 आशा स्वंयसेविका यांना नियुक्‍त करण्यात आल्या आहेत. या कर्मचार्‍यांकडून अधिनस्त यादीनिहाय लाभार्थींची माहिती गोळा होत असून लाभार्थ्यांनी स्वस्तधान्य कार्ड, आधार कार्ड व इतर अत्यावश्यक माहिती देणे अनिवार्य आहे.

यासाठी 28 मे रोजी 6 वार्ड सभेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. शासनाच्या वार्षिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर मीनाताई वरपुडकर,आयुक्‍त पी.शिवशंकर, उपायुक्‍त डॉ.विद्या गायकवाड, उपमहापौर सय्यद समी, गटनेते भगवान वाघमारे, विजयसिंह जामकर, चंदू शिंदे यांनी केले आहे. 

शासनाच्या आदेशान्वये शहरात प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन योजनेच्या सर्वेेक्षणाचे काम सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी, नोडल कर्मचारी व आशा स्वंयसेविकांमार्फत माहिती गोळा करण्यात येणार असून यानुसार पात्र लाभार्थ्यांना 5 लाख रुपयापर्यंतचा अपघात विमा योजनेंतर्गत मिळणार आहे. नागरिकांनी स्वास्थ्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षणात माहिती देऊन सहकार्य करावे.  - डॉ. आरती देऊळकर, जिल्हास्तरीय सनियंत्रण अधिकारी, मनपा परभणी