Fri, Jul 19, 2019 07:34होमपेज › Marathwada › महावितरणचे 86 लाख थकल्याने अंधार कायम

महावितरणचे 86 लाख थकल्याने अंधार कायम

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 2:07AMबीड : प्रतिनिधी

बीड नगर पालिका आणि महावितरणच्या वादात बीड शहर अद्यापही अंधारात बुडालेले आहे. महावितरणची नगरपालिकेकडे 86 लाखांची थकबाकी असल्याने महावितरणने शहरातील दहा हजार पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. बारा दिवसांचा कालावधी उलटूनही नगरपालिकेने थकबाकी भरण्यासाठी काहीही हालचाल केलेली दिसत नाही. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य कायम आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांसह नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील रस्त्यांवर नगरपालिकेने पथदिवे बसवले आहेत. याची संख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे. या पथदिव्यांना केल्या जाणार्‍या वीजपुरवठ्यापोटी महावितरणकडून ठराविक दराने बील नगरपालिकेला दिले जाते. सदरचे बील 86 लाख रुपये एवढे असून चालू बील 13 लाख रुपये एवढे आहे. थकबाकी भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेस पंधरा हप्ते पाडून दिलेले आहेत, मात्र पाच महिन्यांत एकही रुपया नगरपालिकेने जमा केला नाही. त्यामुळे महावितरणने पालिकेस अधिकृत नोटीस दिल्यानंतर पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. बीडच्या विविध प्रश्‍नावर एरव्ही आवाज उठवणारी काकू-नाना आघाडी सध्या विरोधी बाकावर आहे. 

पथदिव्यांची वीज बंद होऊन बारा दिवसांचा कलावधी उलटला तरी या प्रश्‍नावर कोणीही आवाज उठवला नसल्याने नागरिकांत नाराजीची भावना आहे.