Thu, Jun 20, 2019 05:29



होमपेज › Marathwada › कंदुरीत विषबाधा

कंदुरीत विषबाधा

Published On: Jun 13 2019 1:34AM | Last Updated: Jun 13 2019 12:33AM




बीड : प्रतिनिधी

शहरातील धानोरा रोड भागातील गोविंद नगरात  मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास कंदुरीच्या कार्यक्रमात मटण व इतर पदार्थ खाल्ल्याने लहान मुलांसह जवळपास 74 जणांना विषबाधा झाली. या सर्वांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 35 पेक्षा अधिक जणांवर उपचार करून बुधवारी सकाळी सुटी देण्यात आली, तर सायंकाळपर्यंत उर्वरित बाधित व्यक्‍तींवर उपचार सुरू होते.
बाबासाहेब गोकुळे यांच्या घरी मंगळवारी रात्री गोंधळानिमित्त कंदुरीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा पंगती सुरू झाल्या. मध्यरात्रीच्या सुमारास एकामागून एकास त्रास होऊ लागला. काहींना उलट्या तर काहींना मळमळ होऊ लागल्याने तत्काळ संबंधितांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री साडेबारापर्यंत 74 जणांना दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये 15 लहान मुलांचा समावेश होता. नंतर घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागास देण्यात  आली.  सहायक आयुक्‍त कृष्णा दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी ऋषीकेश मरेवार, अनिकेत भिसे व इतर कर्मचारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सर्वाना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांना सांगितले.  

एकाच घरातील 35 जण

जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब गोकुळे यांच्या घरातील सदस्य व पाहुण्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे गोकुळे यांच्या एकट्या घरातील 35 व्यक्‍तींना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. बुधवारीही सर्वांवर उपचार सुरू होते.