Sun, Mar 24, 2019 04:10होमपेज › Marathwada › ७२ प्रकरणांत १ कोटीचा साठा जप्‍त

७२ प्रकरणांत १ कोटीचा साठा जप्‍त

Published On: May 10 2018 1:37AM | Last Updated: May 09 2018 10:38PMपरभणी : नरहरी चौधरी 

अन्‍न व भेसळ विभागाच्या वतीने गत एक वर्षामध्ये तब्बल 72 ठिकाणी कारवाया झाल्या असून यामध्ये 95 लाख 24 हजार 401 रुपयांचा गुटखा व इतर साहित्यांचा साठा जप्‍त केला आहे. तसेच 40 लाख 17 हजार 388 रुपयांचा साठा हा जागेवरच नष्ट करण्यात आला. अन्‍न व औषधी प्रशासनाकडे पुरेसे कर्मचारी नसतानाही मागील वर्षात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात  आल्या आहेत.

अन्नसुरक्षा आणि मानद कायद्याच्या अंमलबजावणीचे काम पुरेशा कर्मचार्‍यांअभावी करणे अन्न वर औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अवघड जागेचे दुखणे झाले आहे. यात सहायक आयुक्‍तांसह दोन अन्‍न निरीक्षक पदे आहेत, पण यातील अन्‍न निरीक्षकांची पदे मागील एक वर्षापासून रिक्‍त आहेत. उसनवारी निरीक्षकांवरच परभणी व हिंगोली जिल्ह्यातील भेसळयुक्‍त पदार्थांच्या कारवाईची मदार असल्याचे दिसते. या विभागांतर्गत आजही मोठ्या प्रमाणात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. याप्रकरणी विभागाकडून कारवाया केल्या जात असल्या तरी हा गुटखा नेमका कोठून येतो याचा मात्र संबंधित अधिकार्‍यांना अजूनतरी थांगपत्ता लागला नाही. दिवाळीनिमित्त मिठाई, खाद्यतेल या अन्नपदार्थांची मागणी वाढते. यात काही समाजकंटक भेसळ करू शकतात. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने त्या काळात विशेष मोहीम आखली होती. 

यामध्ये परभणी व हिंगोली जिल्ह्यातील मिठाई उत्पादक व तेल, मैदा, बेसन विक्रेते यांच्याकडे अचानक भेटी देऊन या पदार्थांचे नमुने पृथःकरणासाठी घेतले होते. यामध्ये 10 आस्थापनांवर छापे टाकून 18 अन्न नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ही मोहीम दिवाळीपर्यंत सुरू राहिली होती. यामुळे नागरिकांना चांगले खाद्यपदार्थ या काळात मिळाले. विभागातर्फे वर्षभरातून उन्हाळा व दिवाळी हंगामात विशेष मोहीम हाती घेतली जाते. 

40 लाखांचा साठा जागेवर केला नष्ट न्यायालयात 48 खटले दाखल

अन्‍न व औषध प्रशासनाच्या वतीने राबवलेल्या मोहिमेतील धडक कारवाईत भेसळयुक्‍त पदार्थ आढळलेल्या व्यावसायिकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. या विभागाने गतवर्षात तब्बल 48 प्रकरणे दाखल करून भेसळीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच काही पदार्थांची तपासणी केली असता वेगवेगळ्या नमुन्यांत 89 नमुने हे भेसळयुक्‍त आढळून आले होते. यात 17 दुधाचे, 17 तेलासह इतर काही पदार्थांचे नमुने आहेत. यातच 9 अन्‍न नमुने हे कमी दर्जाचे व लेबलदोषांचे आढळून आल्याने त्यावरही कारवाई केली आहे.

40 लाखांपर्यंतचा महसूल जमा

कार्यालयांतर्गत देण्यात येणार्‍या परवाना व नोंदणी शुल्काच्या रकमेतून विभागाला एक वर्षात 40 लाखांच्या वर महसुली रक्‍कम जमा झाली आहे. यामध्ये नूतनीकरणासह नवीन-271 परवाने आहेत. यावर्षी 799 परवान्यांची नोंदणी वाढली आहे. नोंदणीत ज्या व्यावसायिकांची उलाढाल ही 12 लाखांच्या आत आहे, त्यांच्यासाठी 5 वर्षांकरिता 500 रुपयांचे शुल्क आकारले जाते. तसेच 12 लाखांवर उलाढाल असणार्‍या व्यावसायिकांसाठी काही ठिकाणी 3 हजार तर काही ठिकाणी 5 हजारांचे शुल्क वर्षाअखेर लावण्यात येते.