Mon, Mar 25, 2019 03:14
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › ६१ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी

६१ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 10:08PMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये 61 हजार 474 शेतकर्‍यांसाठी 226 कोटी रुपये बँकेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता कर्जमाफी मिळणार्‍या शेतकर्‍यांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. पुढील पंधरा दिवसांत जवळपास 20 हजार शेतकर्‍यांच्या प्रस्तावाबाबत पडताळणी होऊन कर्जमाफीची रक्‍कम त्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये 1 लाख पाच हजार शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन प्रस्ताव सादर केले होते. त्यानंतर शासनाकडून वेळोवेळी बँकांना ग्रीन लिस्ट पाठवण्यात आल्या होत्या. त्यानुसार बँकांनी पडताळणी करून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जमा करण्यास सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यात केवळ 36 हजार शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे या कर्जमाफीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या जाऊ लागल्या होत्या. मात्र शासनाने वेळोवेळी पाठवलेल्या ग्रीन लिस्टनुसार आतापर्यंत 61 हजार 474 शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी 226 कोटी रुपयांची रक्‍कम बँकाकडे पाठविले आहे. यामध्ये 41 हजार 272 शेतकर्‍यांसाठी 200 कोटी 75 लाख रुपये, एकर कमी परतफेड योजनेत 1 हजार 983 शेतकर्‍यांसाठी 12 कोटी 91 लाख रुपये तर प्रोत्साहन योजनेमध्ये 18 हजार 219 शेतकर्‍यांसाठी रक्‍कम पाठवण्यात आली आहे.