होमपेज › Marathwada › वर्षात 600 बांधकाम परवाने

वर्षात 600 बांधकाम परवाने

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 10:39PMपरभणी : प्रतिनिधी

शहर महानगरपालिकेने एका वर्षात  600 नवीन बांधकामांना परवानगी दिली आहे. बांधकामांचा परवाना देत असताना जलपुनर्भरण व वृक्षारोपण करणे  बंधनकारक   करण्यात आले, परंतु  झालेल्या नवीन बांधकामधारकांनी  वृक्षारोपण केले नाही आणि जलपुनर्भरण  करण्यात आलेले नाही. यामुळे मनपाच्या नियमास एकप्रकारे त्यांनी केराची टोपली दाखवली आहे. 

पाणी टंचाईमुळे पाणीबचत करण्याचा प्रयत्न मनपाकडून झाला. जलपुनर्भरण व वृक्षारोपण उपक्रम माध्यमातून तत्कालीन मनपा आयुक्‍त राहुल रेखावार यांनी शहरातील नवीन बांधकामधारकांनी पाणी पुनर्भरण व वृक्षारोपण करणे बंधनकारक केले होते.  बांधकाम परवाना देताना याची शहानिशा करण्याचे आदेशही संबंधित विभागास दिले. शहरातीतील हातपंप व बोअरची पाणीपातळी वाढावी हा उद्देश ठेवला होता. मात्र नागरिकांकडून या उपक्रमास प्रतिसाद मिळाला नसल्याने तो अधिकाधिक लोकांपर्यंत  पोहचविण्यासाठी सर्वसाधरण सभेत जलपुनर्भरण व वृक्षारोपण करणार्‍यांना घरपट्टीत पाच टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. नागरिकांनी पावसाळ्यात पडणार्‍या छतावरील पाण्याचे पुनर्भरण करावे, घरासमोर किमान तीन ते चार झाडे लावावीत, असे आवाहन केले. संबंधित विभागाकडून  अंमलबजावणीत दिरंगाई केल्याने जलपुनर्भरण व वृक्षारोपण होऊ शकले नाही. वृक्षांसाठी जाळ्या व  इतर  साहित्य देऊनही वृक्षलागवड  झाली  नाही.

पाणी बचतीसाठी हाती घेतलेल्या या उपलक्रमात नागरिकांचा उत्सफूर्त सहभाग होत नाही अशा भावना मनपातील संबंधित विभागाचे कर्मचारी व्यक्‍त करत आहेत.  एकीकडे  शासन वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. विविध प्रकारच्या प्रोत्साहनपर योजना सुरू करुन वनक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु परभणी शहरात मात्र काही अपवाद वगळता नागरिक आपल्या घरासमोरील झाडे तोडून बांधकाम करत आहेत. त्यामुळे यापुढे मनपाने बांधकामधारकांना वृक्षलागवड व पुनर्भरण करणे अनिवार्य करायला लावावे अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत आहे. या सर्व बाबीसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलून जलपुनर्भरण व वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित बांधकामधारकांवर कठोर कारवाई करायला हवी अशी अपेक्षाही पर्यावरणप्रेमींकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.