Sun, Nov 18, 2018 01:29होमपेज › Marathwada › बापरे! शाळेच्या स्‍वयंपाकगृहात आढळले ६० साप

बापरे! शाळेच्या स्‍वयंपाकगृहात आढळले ६० साप

Published On: Jul 13 2018 3:24PM | Last Updated: Jul 13 2018 3:24PMवसमत : प्रतिनिधी

हिंगोलीतील वसमत तालुक्यात एका जिल्‍हा परिषदेच्या शाळेत एक नाही, दोन नाही तर तब्‍बल ६० साप आढळले. हे साप साधे-सुधे नसून सर्वात विषारी समजल्या जाणार्‍या घोणस जातीचे आहेत. परंतु या प्रकारामुळे घाबरून न जाता शिक्षक आणि ग्रामस्‍थांनी त्यांना पकडून जीवदान देत सुरक्षित ठिकाणी सोडले. 

पांगरा बोखारे येथील शाळेच्या स्‍वयंपाकगृहात १२ जुलै रोजी एक घोणस जातीचा साप आणि ६० पिलं आढळली. त्यानंतर अनेकांना घाम फुटला. घाई गडबडीतच काहींनी त्यांना मारण्याचा प्रयत्‍न केला. पंरतु मुख्याध्यापक त्र्यंबक भोसले आणि भिमराव बोखारे यांच्यासह काही ग्रामस्‍थांनी पुढाकार घेत सापाला मारू दिले नाही. तर त्यांनी वसमत येथील सर्पमित्र विकी दयाळ आणि त्याचा सहकारी बाळासाहेब भालेराव यांच्याशी संपर्क साधला. 

सर्पमित्र घटनास्‍थळावर दाखल होईपर्यंत सारा गाव शाळेत गोळा झाला होता. दोघा सर्पमित्रांनी दोन तास परिश्रमपूर्वक सापांना बाटलीबंद केले. दरम्यान, ग्रामीण भागात साप आढळणे मोठी गोष्‍ट नाही परंतु एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात साप आढळणे आणि तेही शाळेत ही पंचक्रोशीतील पहिलीच घटना असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर मुख्याध्यापक भोसले यांच्या हस्‍ते ग्रामस्‍थांच्या वतीने  सर्पमित्रांचा शाल, श्रीफळ देऊन सत्‍कार करण्यात आला.