होमपेज › Marathwada › उसातील आंतरपिकातून ५० हजारांचे उत्पन्न

उसातील आंतरपिकातून ५० हजारांचे उत्पन्न

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 05 2018 12:52AMपरभणी : प्रतिनिधी

पाथरी तालुक्यातील देवेगाव या छोट्यशा गावातील शेतकरी लक्ष्मण गंगाधर मगर यांनी दुष्काळावर मात करीत आपल्या दोन एकर शेतात लागवड केलेल्या उसाच्या पिकात कांद्याचे अंतरपीक घेतले. या पिकातून त्यांना जास्तीचे 50 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच उसाचे त्यांना वेगळे अडीच लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. 

आजच्या परिस्थितीत शेती हा व्यवयास शेतकर्‍यांसाठी अडचणीचा झाला आहे, पण देवेगाव येथील लक्ष्मण या शेतकर्‍याने शेती हाच उत्तम व्यवसाय असल्याचा प्रत्यय आणला आहे. जे शेतकरी कुटुंबातील युवक शेती व्यवसाय सोडून नोकरीच्या मागे धावत आहेत. त्यांना हा उपक्रम एक मार्गदर्शक ठरणार आहे. लक्ष्मण यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर जमीन सिंचनाखालील आहे. यात एक विहीर आहे. शेतात सोयाबीन, कपाशी, ऊस, गहू, भुईमूग,कांदा अशी पिके घेतली जातात.

पण लक्ष्मण यांना शेतीची पुरेशी माहिती नसल्याने यापूर्वी त्यांना पुरेसे उत्पादन काढता आले नाही. नंतर 2013 पासून रिलायन्स फाउंडेशनद्वारे दिले जाणारे कृषी संदेश त्यांच्या मोबाइलवर नियमित आले. त्यातून लक्ष्मण यांना शेतीबाबत घरबसल्या माहिती मिळत गेली. याचा योग्य वापर करीत ते शेती करण्यास लागले. यात ऊस हे पीक 15 ते 18 महिन्यांच्या कालावधीचे आहे. यात एखादे आंतरपीक घ्यावे, असा विचार त्यांनी केला. सर्वप्रथम हवामान, जमीन, बाजारपेठेचा अभ्यास करून 2 एकर शेतीत या पिकामध्ये आंतरपीक म्हणून कांदा पिकाची लागवड केली. सध्या ऊस हे महत्त्वाचे पीक असणार्‍या या शेतात पाण्याच्या उपलब्धतेचा व बाजारपेठेतील मागणीचा विचार करून कांद्याची लागवड त्यांना चांगलीच फायदेशीर ठरली. यातून त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे काम सुरू केले. त्यांनी नंतर रिलायन्स फाउंडेशनशी मोबाइलवर टोल फ्री नंबरवर संपर्क साधत मार्गदर्शन घेतले.

यातच शेतात त्यांनी सध्या 1 एकरमध्ये भुईमूग व एक एकरात गव्हाचे पीक घेतले. त्याचे व्यवस्थापन करत असताना त्यांना रिलायन्सची माहिती सेवा यांच्याकडून दिला जाणारा कृषी सल्ला मोलाचा ठरला. अर्थशास्त्राचा विचार केल्यास त्यांना दोन एकरांत 50 ते 60 क्विंटल कांद्याचे उत्पन्न अपेक्षित आहे. यासाठी लक्ष्मण यांना 10 हजारांचा खर्च आला आहे.एकूण खर्च वजा जाता कांद्याच्या लागवडीपासून 50 हजारांचा निव्वळ नफा मिळणार आहे. 

सध्याच्या उसाच्या 2 हजार 500 रुपयांचे उत्पन्न प्रतिटन भावाप्रमाणे 3 लाखांचे उत्पन्न व यातून खर्च वजा जाता त्यांना 2 लाख 50 हजारांचे उत्पन्न मिळणार आहे. कांद्यापासून 50 हजार व उसापासून 2 लाख 50 हजार असे एकूण 3 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. अशा पध्दतीने लक्ष्मण यांनी शेतीत आंतरपीक घेऊन दुष्काळावर मात करीत 50 हजारांचे जास्तीचे उत्पन्न कांदा या पिकापासून मिळविले आहे.