Sun, Apr 21, 2019 00:32होमपेज › Marathwada › निम्न दुधना प्रकल्प क्षेत्रात होणार ५० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती

निम्न दुधना प्रकल्प क्षेत्रात होणार ५० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 16 2018 10:45PMसेलू : प्रतिनिधी

निम्न दुधना प्रकल्प क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत बैठक घेतली. यावेळी प्रकल्पाच्या अभियंत्यांनी सुमारे 250 हेक्टर जागा उपलब्ध होऊ शकते अशी शक्यता वर्तवली. त्याप्रमाणे तेथे जवळ पास 50 मेगावॅट एवढा सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभा होऊ शकतो. यात जलसंपदा विभाग असल्यामुळे  लोणीकरांनी तत्काळ दूरध्वनीवर जलसंपदामंत्री  गिरीश महाजन यांना त्यांच्या विभागाला सूचना देण्याचे कळविले. यामुळे निम्न दुधना परिसरात हा मोठा प्रकल्प उभा राहील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

ऊर्जा निर्मितीबाबत शासनाच्या ग्रीन एनर्जी, क्लीन एनर्जी या धोरणाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याचे धोरण शासनाने  हाती घेतले आहे. ऊर्जा विभाग राज्यात ठिकठिकाणी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवणार आहे. यासाठी जागा उपलब्ध असणे ही मोठी गरज बनली आहे. शासनाच्या या धोरणाप्रमाणे हा प्रकल्प निम्न दुधना प्रकल्पाच्या क्षेत्रात राबविण्यासाठी लोणीकरांनी आग्रह धरला आहे. या संबंधी  झालेल्या बैठकीमध्ये निम्न दुधना प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवर, कॅनॉलवर किंवा धरणाच्या साठलेल्या पाण्यावर तरंगणारे सौरपॅनल अशा विविध पध्दतीने ते उभारले जाऊ शकतात. या सर्व बाबींची शक्यता झालेल्या बैठकीमध्ये तपासण्यात आली. बावनकुळे यांनी तत्काळ महानिर्मिती व वीजवितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना सदर क्षेत्रात जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. 

पाहणी पथकाच्या अहवालानंतर प्रक्रिया

पाहणी पथकामध्ये महावितरण व महाजनकोचे वरिष्ठ अधिकारी राहणार आहेत. तसेच हे पथक जालना व परभणीच्या जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक करून अजून काही शासकीय जमीन उपलब्ध होईल का याची शक्यता तपासून पाहणार आहे. हा  संयुक्त पाहणी अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्या अहवालानुसार लोणीकर, बावनकुळे व महाजन हे सर्व मंत्री एकत्रित निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.