Tue, May 21, 2019 22:57होमपेज › Marathwada › जिल्ह्यात 5 हजार 697 गरोदर महिलांना बुडीत मजुरी

जिल्ह्यात 5 हजार 697 गरोदर महिलांना बुडीत मजुरी

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 05 2018 9:58PMपरभणी : प्रतिनिधी

मानवी निर्देशांक उंचावण्यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रम परभणी जिल्ह्यात जिल्हाधिकारी पी.शिवशंकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्या सनियंत्रणाखाली राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 2017-18 मध्ये जिल्ह्यात 5 हजार 697 गरोदर महिला लाभार्थ्यांना बुडीत मजुरीचा लाभ देण्यात आला आहे.आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तज्ञ महिला डॉक्टरांमार्फत महिन्यातून  2 वेळा गरोदर माता व बालरोगतज्ञ यांच्यामार्फत बालकांची  तपासणी करण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच अनुसूचित जाती जमाती व दारिद्र्यरेषेखालील गरोदर- बाळंत मातांना प्रति माता 4000 थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतात.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र,  उपकेंद्र स्तरावर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्त तपासणी, आहाराविषयी मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात आला. परभणी जिल्ह्यात सन 2017-18 या वर्षात एकूण 610 मानव विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये 24 हजार 722 गर्भवती महिलांची व 14 हजार 431 स्तनदा मातांची  तपासणी व समुपदेशन करण्यात आले.  त्याचप्रमाणे 0 ते 6 महिने वयोगटांतील 14432 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. सन 2017-18 मध्ये अनु.जाती जमाती व दारिद्य्ररेषेखालील गरोदर- बाळंत मातांना बुडीत मजुरी देणे या योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात 5697 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे एकूण 227.88 लक्ष रुपये थेट लाभ देण्यात आलेला आहे.