Sun, Aug 25, 2019 03:45होमपेज › Marathwada › आरोग्य संपकर्‍यांना 48 तासांचा अल्टिमेटम

आरोग्य संपकर्‍यांना 48 तासांचा अल्टिमेटम

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 10:38PMबीड : प्रतिनिधी

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या कर्मचार्‍यांनी काम बंद केल्याने 50 पेक्षा अधिक लसीकरण, डाटा एन्ट्री, आयुष्यमान भारत योजना, मातृत्व वंदन योजना आदींसह वैैद्यकीय सेवा व प्रशासकीय कामांना ब्रेक लागले आहे. या कर्मचार्‍यांना प्रशासनाने 48 तासांचे अल्टिमेटम दिले आहे. या कालावधीत रुजू न झाल्यास कार्यमुक्त करून नवीन भरती करण्याचा इशाराही दिला आहे. 

एनआरएचएम (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान) अंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून काही अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांना कंत्राटी तत्वावर कामावर घेण्यात आले आहे. या अधिकारी व कर्मचार्‍यांना शिक्षण, अनुभवानुसार शासकीय सेवेत कायम रुजू करावे, अशी या कर्मचार्‍यांनी प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी या कर्मचार्‍यांकडून साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. बीड येथील एनआरएचएम, एनएचएम, एयूएचएम, आरबीएसके व टी.बी. या विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कर्मचार्‍यांच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील लसीकरण सेवा, आरसीएच वेब पोर्टलवरील काम, डाटा एन्ट्री, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, लहान मुलांना डोस, गरोदर मातांची तपासणी, आयुष्यमान भारत योजना अशा अनेक योजनांच्या कामांना खीळ बसली आहे. यासह कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा परिणाम वैद्यकीय सेवेवर व प्रशासकीय कामावरही झाला आहे. याच दरम्यान मातृत्व वंदन योजनेचे प्रशिक्षण होते. या प्रशिक्षणासही आंदोलक कर्मचार्‍यांनी दांडी मारली आहे. या आंदोलनात जफरोद्दिन मोमीन, अनिल आष्टेकर, सय्यद रमीज, किशोर सावंत, बालाजी आहेरकर, अनिल टाक, जितेंद्र केदार, वैभव लोहार, निलकंं दुनघव, विकास शिंदे, रमेश तांदळे, कार्तिक काळे, प्रभाकर गळगटे, विष्णू मुंढे, किशोर बडगे आदींनी सहभाग घेतला आहे. 

अधिकारी, कर्मचार्‍यांकडून लाँग मार्चची तयारी

एनआरएचएम अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने साखळी आंदोलन सुरू केले आहेत. 8 मे पासून सुरू झालेले हे धरणे आंदोलन 17 पर्यंत चालणार आहे. यानंतर 18 मे पासून नाशिक ते मंबई असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. यासाठी जिल्हानिहाय ड्रेसकोड, शिस्त, पिण्याचे पाणी, स्वच्छता, मुक्काम, जेवण आदींचे नियोजन करण्यात आले आहे. 

नवीन भरतीचा इशारा

एनआरएचएम अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी धरणे आंदेालनाचे निवेदन दिले होते. या आंदोलनामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे या कर्मचार्‍यांना प्रशासनाने 48 तासांचे अल्टिमेटम दिले आहे. या कालावधीत रुजू न झाल्यास कार्यमुक्त करून नवीन भरती करण्याचा इशाराही दिला आहे.