Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Marathwada › ४७३ बालके कुपोषित

४७३ बालके कुपोषित

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 16 2018 10:41PMहिंगोली : प्रतिनिधी

राज्य शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कुपोषणमुक्‍तीचे स्वप्न पाहत असले तरी हिंगोली मात्र तब्बल 473 बालके तीव्र कुपोषित आढळल आहेत. या बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असून अतिरिक्‍त आहार देऊनही बालके कुपोषणाबाहेर येत नसल्याने हा प्रयोग जिल्ह्यात फसल्याचे चित्र समोर आले आहे.

ग्रामीण भागात अजूनही बालकांना संतुलित आहार मिळत नसल्याने कुपोषित बालकांची संख्या मोठी आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण खात्याच्या वतीने सहा प्रकल्प कार्यालयांतर्गत येणार्‍या 1 हजार 79 अंगणवाड्यांतील बालकांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये तब्बल 473 बालके कुपोषित आढळली. तर कमी कुपोषित बालकांची संख्या एक हजार असल्याने जिल्ह्यात कुपोषणमुक्‍तीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील कुपोषित बालकांना कुपोषणाबाहेर काढण्यासाठी 50 लाखांचा निधी दिला आहे. यातून एका बालकावर अतिरिक्‍त पोषण आहार, वैद्यकीय सेवा यासाठी दोन महिन्यांचे दीड हजार रुपये खर्च करण्याचे सांगितले आहे, परंतु प्रशासनाला कुपोषण आटोक्यात आणण्यात यश येत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सहा प्रकल्पांतर्गत तपासणी करण्यात आली होती. यामध्ये कळमनुरी 23, हिंगोली 61, वसमत 134, सेनगाव 93, औंढा नागनाथ 129, आखाडा बाळापूर प्रकल्पांतर्गत 33 बालकांचा समावेश आहे. 

महिला व बालकल्याण विभागाकडून कुपोषण मुक्‍तीसाठी विविध योजना राबविण्यात येत असल्यातरी कुपोषणग्रस्त बालकांची संख्या घटत नसल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे बालकांचे कुपोषण कमी करण्याची जबाबदारी अंगणवाडीच्या सेविकेवर देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातूनच कुपोषणमुक्‍तीचा कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी, म्हणावे तसे यश मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

तीव्र कुपोषित बालकांसाठी 251 बाल विकास केंद्रामार्फत अतिरिक्‍त पोषण आहाराबरोबरच वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या केंद्रात दाखल झालेल्या अनेक बालकांच्या प्रकृतीत सुधारण होत आहे. महिनाभरात ही बालके सामान्य पातळीवर येतील यासाठी परिश्रम घेतले जात असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण अधिकारी गणेश वाघ यांनी दिली.