Fri, Apr 19, 2019 08:21होमपेज › Marathwada › जिल्हा परिषद लढविणारे 46 उमेदवार अपात्र, 136 रडारवर

जिल्हा परिषद लढविणारे 46 उमेदवार अपात्र, 136 रडारवर

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 10 2018 2:01AMबीड : प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होऊन वर्ष लोटले तरी अद्यापही काही उमेदवारांनी खर्च सादर करण्यास चालढकल केली आहे. वारंवार नोटीस देऊनही कानाडोळा करणार्‍या जिल्हा परिषद निवडणूक लढविणार्‍या 46 उमेदवारांना पाच वर्षांसाठी अपात्र करण्यात आले आहे. अशाच कारवाईचा ससेमिरा आता पंचायत समिती निवडणूक लढविणार्‍या 136 उमेदवारांमागे लागला आहे. 

गतवर्षी जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. निवडणुकांना जे उमेदवार उभे होते, त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार झालेला खर्च सादर करावा लागतो. उमेदवारांना निवडणुकीत  खर्च सादर करण्यासाठी विहित मुदत देण्यात आली आहे. असे असतानाही याकडे अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी दुर्लक्ष केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती लढविणार्‍या अनेक उमेदवारांनी निवडणूक मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली. यासाठी बॅनरबाजी करतानाच वाहने लावून प्रचार केला.

अनेकांनी फटाके, तोफा वाजवित निवडणुकांचा बार उडवून दिला. या सर्व खटाटोपानंतरही पदरी अपयश आल्याने अनेकांनी हा नाद सोडून दिला आहे. असे असले तरी निवडणूक झाल्यानंतर त्यांनी केलेला खर्च विहित नमुण्यात व मुदतीत सादर करणे गरजेचे होते. या मुदतीत जिल्हा परिषदेच्या 56 उमेदवारांनी खर्च सादर केला नव्हता.  खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांनी निवडणूक विभागाने नोटीस बजावली होती. यानंतर 10 उमेदवारांंनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत खर्च सादर केला, तर तब्बल 46 उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना पाच वर्षांसाठी अपात्र करण्यात आले आहे. यापुढील पाच वर्षांत त्यांना जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास आता अपात्र ठरविण्यात आले आहे.

पंचायत समिती निवडणूक लढविणार्‍या 136 उमेदवारांनीही अद्याप आपला खर्च सादर केलेला नाही. या उमेदवारांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या उमेदवारांनीही खर्च सादर न केल्यास त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील नायब तहसीलदार महाजन 
यांनी दिली.