होमपेज › Marathwada › गायीच्या पोटातून काढले 40 किलो प्लास्टिक 

गायीच्या पोटातून काढले 40 किलो प्लास्टिक 

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 10:18PMहिंगोली : प्रतिनिधी

मानवाने खाऊन शिल्‍लक अन्‍न प्लास्टिकच्या कॅरिबॅगमध्ये भरून ते जवळील उकंड्यावर टाकले जाते. कालांतराने हेच प्लास्टिक बंद कॅरिबगसह मोकाट जनावरे जशाच्या तसे गिळून घेतल्याने पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा होते. अशाच एका संकरित गायीच्या पोटाचा घेर वाढल्याने मालकाने जिल्हा पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालयात उपचारासाठी दाखल केले. पशुधन विकास अधिकार्‍यांनी तपासून सदरील गायीच्या पोटातून तब्बल चाळीस किलोच्या अखाद्य वस्तू शरीराबाहेर काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली.

हिंगोली शहरातील अष्टविनायक नगरात राहणारे शेख पाशा शेख जंगलू यांच्याकडे स्वत:च्या मालकीची संकरित गाय आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून गायीच्या पोटाचा घेर दिवसेंदिवस वाढत चालल्याचे लक्षात आले. त्यांनी आपली गाय तत्काळ हिंगोली येथील जिल्हा पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालयात उपचारासाठी आणली होती.चिकित्सालयात आणण्याच्या अगोदर गायीला चालणेसुद्धा अवघड बाब बनली होती. सदर गायीची योग्य तपासणी पशुधन विकास अधिकार्‍यांनी करून गायीच्या पोटात काही अखाद्य वस्तू असल्याचे समोर आहे. त्यानंतर संबंधित पशुधन विकास अधिकार्‍यांनी सदरील गायीवर मंगळवारी (दि. 15) शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत गायीच्या पोटातून तब्बल चाळीस किलोंवर अखाद्य वस्तू बाहेर काढत यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.

दरम्यान, सदरील गायीवर तब्बल चार तासांवर शस्त्रक्रिया चालली. यामध्ये गायीच्या पोटातून आंब्याच्या साली, कोय, प्लास्टिक कॅरिबॅग, तारा, रेती, खडे, दोर्‍या, रबरी वस्तू आदी अशा अखाद्य वस्तू बाहेर काढल्याने गायीला जीवदान मिळाले आहे. सदरील शस्त्रक्रिया पशुधन विकास अधिकारी डॉ.अजय धमगुंडे, परिचर रामजी शिंदे, मदतनीस अंबादास मोहिते, शिवशंकर लुंगे, सविता पवार, परमेश्‍वर काचगुंडे, शेख पाशा यांच्यासह पशू चिकित्सायालचे कर्मचारी उपस्थित होते.