Wed, May 22, 2019 10:17होमपेज › Marathwada › वर्षभरात चार हजार शस्त्रक्रिया

वर्षभरात चार हजार शस्त्रक्रिया

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 10:27PMहिंगोली : प्रतिनिधी

सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांवर तत्काळ उपचार मिळावे, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. या अंतर्गत 1 एप्रिल ते 31 मार्च 2018 या आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने तब्बल 4 हजार 201 विविध प्रकारच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मात्र आरोग्य विभागात रिक्‍त पदांमुळे सदर शस्त्रक्रिया करण्यासाठी चांगलीच दमछाक झाली.

मागील काही वर्षांपासून जिल्हा आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा कारभार चांगलाच ढेपाळला होता. मात्र अलीकडच्या गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य विभागाचा बर्‍यापैकी कारभार पूर्वपदावर आल्याचे त्यांच्या कार्यावरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे रिक्‍त असलेली पदे केवळ वरिष्ठांकडे अहवाल पाठवून कळविली जातात, परंतु त्याचा पाठपुरावा होत नसल्याने सध्या कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांवर अनावश्यक ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकाराकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयातील रिक्‍त असलेले रिक्‍त पदे भरण्यासंदर्भात हालचाली करण्याची गरज आहे. तरीसुध्दा सन 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या आर्थिक वर्षामध्ये विविध प्रकारच्या 4 हजार 201 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

जिल्हास्तरावर एक जिल्हा रुग्णालय, 24 प्राथमिक आरोग्य केंद्र, एक स्त्री रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय तर औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि आखाडा बाळापूर येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहेत. या सर्व रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना शासकीय सेवेचा लाभ दिल्या जाते. सदर रुग्णालयअंतर्गत दरवर्षी विविध प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी उद्दिष्ट दिल्या जाते. यंदाही देण्यात आले होते. मात्र सर्व रुग्णालयात महत्त्वाचे काही अधिकारी व कर्मचार्‍यांची रिक्‍त पदे शासनाने भरली नसल्याने जिल्हा आरोग्य विभागाच्या यंत्रणेला उद्दिष्टपूर्तीसाठी अडचण येत आहे.