Tue, Apr 23, 2019 13:45होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील 36 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी

जिल्ह्यातील 36 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 10:52PMहिंगोली : प्रतिनिधी

शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या विविध निकषांमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे शासनाने हिंगोली जिल्हाभरातील तब्बल 36 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट 112 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तर उर्वरित जवळपास 7 हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविली जात आहे. योजना जाहीर करून आजमितीस सहा महिन्यांचा काळ ओलांडला, मात्र शासनाकडून या न त्या कारणावरून वेळोवेळी निकषामध्ये काही बदल करण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले. दिवसेंदिवस शेतकर्‍यांना अनेक कारणांमुळे शेतकरी राजात तीव्र संताप व्यक्‍त केला जात होता. अखेर शासनाने हिंगोली जिल्ह्यातील 36 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी देवून त्यांच्या खात्यावर 112 कोटी रुपयांची रक्‍कम जमा केली आहे. तर उर्वरित सात हजार शेतकर्‍यांनी दीड लाखापेक्षा अधिक कर्जाची रक्‍कम भरल्यानंतरच त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्याचा विचार करता शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत तब्बल 1 लाख 9 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल केले होते. तद्नंतर किती शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ होईल असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. तसेच शासनाकडून बँकांना ग्रीनलिस्ट प्राप्‍त झाल्यानंतर बँकेने पाठविलेली माहिती व शेतकर्‍यांनी भरलेली माहिती तपासून पाहण्यात आली होती. त्यानुसार कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यात 43 हजार 512 शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी 160 कोटी 15 लाख रुपयांची रक्‍कम प्राप्‍त झाली. पैकी 36 हजार 487 शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 112 कोटी 83 लाख रुपयांची रक्‍कम वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने 19 हजार 720 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 24 कोटी 63 लाख रूपये, राष्ट्रीयीकृत बँकेने 10 हजार 534 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 56 कोटी 40 लाख रुपये तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 6 हजार 223 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 31 कोटी 80 लाख रुपयांची रक्‍कम जमा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Tags : Marathwada, 36 thousand, farmers, debt, waiver