होमपेज › Marathwada › ३०० वेळा डायलिसिस करूनही प्रकृती ठणठणीत

३०० वेळा डायलिसिस करूनही प्रकृती ठणठणीत

Published On: Apr 28 2018 1:44AM | Last Updated: Apr 27 2018 11:19PMनरहरी चौधरी : परभणी 

किडनी निकामी झालेल्या रुग्णांवर मोफत उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थापन केलेल्या स्वतंत्र कक्षात 300 वेळा डायलिसिसचे उपचार केलेल्या एका 45 वर्षीय महिलेची प्रकृती ठणठणीत असल्याचे पाहावयास मिळाले आहे. या कक्षात दररोज आठ रुग्णांवर डायलिसिस उपचार केले जात आहेत. 

जिल्ह्यात अनेक प्रकारचे किडनी आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. खासगी रुग्णालयात या रुग्णांकडून अवाच्या सव्वा पैशांची आकारणी करून त्यांची लूट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजही अनेक नागरिक शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात धजावत नसल्याचे वास्तव आहे.  

जिल्हा सामान्य रुग्णालयात डायलिसिस कक्षाची उभारणी करण्यात आलेली आहे. या कक्षात परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात राहणार्‍या सबिया बेगम अहेमद खदीर खान (45) यांना किडनीचा आजार जडल्याने डायलिसिस उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत तब्बल 300 वेळा या प्रकाराचे उपचार करण्यात आलेले आहेत. या उपचारासाठी जो काही औषधीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे, त्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जावेद अथर यांना दिल्यानंतर ते तत्काळ उपलब्ध करून देतात.  अशी माहितीही डॉ. बी. एस. नरवाडे यांनी दिली.

300 वेळा डायलिसिस उपचार करूनही हा रुग्ण स्वतःच्या पायाने आजही चालत येत उपचार घेत आहे. असे अनेक रुग्ण आहेत ते आजही ठणठणीत आहेत. या विभागात सकाळी 4 व दुपारी 4 रुग्णांवर डायलिसिस केले जातात. रुग्ण गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना गरजेनुसार दररोज किंवा एक दिवसाआड डायलिसिसची सुविधा दिली जाते.  -डॉ. बी. नरवाडे, कक्ष प्रमुख

चार वर्षांपासून किडनी आजारावर उपचार घेत आहोत. खासगी रुग्णालयात उपचाराचा खर्च न परवडणारा आहे. यामुळे खासगीत न जाता शासकीय डायलिसिस विभागांतर्गत उपचार घेतल्याने आम्हाला आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागले नाही.  - सबिया बेगम रुग्ण

चार महिन्यांपूर्वी नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेलो होतो. तेथे माझ्याकडून 70 हजार रुपये घेतले. या पैशात केवळ 4 ते 5 वेळेस डायलिसिस झाले. नंतर पैशांची चणचण भासल्याने परभणीतील शासकीय कक्षात उपचार घेणे सुरू केले, यात दोन महिन्यांत 16 वेळा डायलिसिस उपचार झाले.  - सय्यद एजाज, रुग्ण