Sat, Jul 20, 2019 15:13होमपेज › Marathwada › दीड एकरमध्ये टरबुजातून तीन लाखांचे उत्पन्न

दीड एकरमध्ये टरबुजातून तीन लाखांचे उत्पन्न

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 11:30PMदिंद्रुड : अविनाश कानडे

उजाड माळरान, पाणीही जेमतेम आणि मनुष्यबळाची कमतरता असतांनाही जिद्द आणि परिश्रमाला आधुनिकतेची जोड देऊन ‘असाध्य ते साध्य’ करता येऊ शकते हे नाकलगांवच्या तरुणाने कृतीतून सिद्ध करुन दाखवले आहे. वाळवंटात नंदनवन फुलवून दीड एकर मध्ये ‘तीन महिन्यात तीन’ लाखाचे उत्पन्न घेणार्‍या तरुणाची ही यशोगाथा आहे. 

माजलगांव तालुक्यातील नाकलगांव येथील पद्माकर ढोले या तरुणाला केवळ 97  गुंठे जमीन असून त्यात 1 बोअर आहे. कमी वेळेत भरघोस उत्पन्न देणारे पीक असल्यामुळे त्यांनी टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. यात सतीश बुरंगे व चंद्रकांत फपाळ यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केले. नांगरणी व रोटावेटर ने जमीन भुसभुशीत करुन 5.5 फुटावर बेड केले. त्यात कुजलेले शेणखत व मिश्रखते भरुन मल्चिंग पेपर अंथरण्यात आला. त्यावर आलापूर येथील निसर्ग हायटेक नर्सरीतून उपलब्ध झालेल्या सिजेंटा कंपनीच्या शुगरकिंग जातीच्या टरबूजाची सव्वाफुटावर लागवड करण्यात आली. 

ठिबकद्वारे पाणी
फळधारणेच्या अवस्थेत पीक येईपर्यंत दिवसातून 1 ते 1.5 तास तर त्यानंतर दररोज 5 ते 6 तास ठिबकद्वारे पाणी देण्यात आले. 19.19.19, 12.61.0, 13.40.13, 0.52.34, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन या विद्राव्य खतांच्या मात्रा ठिबकद्वारे दिल्या गेल्या. तसेच शेवटच्या आठवड्यात फळांना गोडी व गडद लाल रंग येण्यासाठी 0.0.50 व पोट्याशियम शोनाइट देण्यात आला. कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करण्यात आली.

पन्नास टन माल
या आठवड्यात टरबूज विक्रीसाठी तयार झाले असून मुंबई च्या व्यापार्‍याने 6.90 पैसे प्रतिकिलो दराने जाग्यावरुन खरेदी केली आहे. आतापर्यंत दीड एकरात 50 टन माल निघाला आहे. त्यापैकी 10 टनाला हलक्या प्रतवारीमुळे 4 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला आहे. 

उत्पादनासाठी एकूण 1 लाख 20 हजार रुपये खर्च आला असून तीन महिन्यात खर्च वजा जाता पद्माकर ढोले यांना 1 लाख 80 हजार रुपये निव्वळ नफा राहिला आहे. जिद्द आणि परिश्रमाला आधुनिकतेची जोड देऊन माळरानात नंदनवन फुलविणार्‍या या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.