Sat, Mar 23, 2019 12:04होमपेज › Marathwada › संक्रांतीचं वाण म्हणून दिली 25 शौचालये

संक्रांतीचं वाण म्हणून दिली 25 शौचालये

Published On: Feb 02 2018 1:34AM | Last Updated: Feb 02 2018 1:34AMअंबड : अशोक शहा 

मकर संक्रांतीनिमित्त महिलांना वाण म्हणून झाडांची रोपे, लोहयुक्त गोळ्या, डस्टबीन आदी वस्तू देतात. मात्र डोमेगाव येथील शेळके दाम्पत्याने संक्रांतीचे औचित्य साधून गावात शौचालये बांधण्याचा विडा उचलला. त्यासाठी त्यांनी दागिने गहान ठेऊन खासगी एजन्सींकडून कर्ज काढून 25 स्वच्छतागृहे गावात बांधली. शेळके दाम्पत्यांनी मकर संक्रांतीनिमित्त महिलांना स्वच्छतागृहांचे वाणच दिल्याची चर्चा होत आहे.

बाबासाहेब शेळके यांनी पत्नी सविता शेळके यांचे दागिने गहाण ठेवून 7 हजार रुपये जमा केले. तसेच एलआयसीच्या पॉलिसीवर 8 हजार पाचशे रुपयांचे कर्ज काढले. ग्रामीण कुटा फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा.लि. कडून 50 हजार रुपये कर्ज घेतले. या शिवाय ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून मिळणारा 3 महिन्यांचा पगार 16 हजार आठशे रुपये असे एकूण 82 हजार तीनशे रुपये आणि उपसरपंच धोंडिराम काळे यांच्याकडून 27 हजार व ग्रामपंचायत सदस्य कान्हूजी चोथे यांच्याकडून13 हजार रुपये उसनवारीवर घेतले. एकूण 1 लाख 22 हजार तीनशे रुपयांची रक्कम जमा केली. गावातील 101 कुटुंबाची नावे एस.बी.एम. यादीत असून यापैकी 18 कुटुंबांना शौचालयांचे अनुदान मिळाले.  मात्र उर्वरित लोकांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शौचालय बांधकाम केले नाही. त्यामुळे शेळके यांनी संबंधित लोकांचे संमतीपत्र घेत स्वतः शौचालय बांधकाम सुरू केले. यासाठी ग्रामपंचायतनेही संबंधित लोकांचे शौचालय बांधून त्याचे पैसे ग्रामपंचायत खात्यावर जमा झाल्यानंतर शेळके यांना देण्यात येईल, असा ठराव दिला. आतापर्यंत शेळके यांनी 25 स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले असून पुढील काम सुरू आहे. याकामी त्यांना सरपंच निर्मला अशोक चौतमल, विजय चौतमल, ग्रामसेवक व्ही.पी.बागूल यांच्यासह  ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असल्याचे शेळके यांनी सांगितले.

 यापूर्वी शेळके यांनी आपल्या गावाला हागणदारीमुक्त करण्यासाठी दीड एकर शेती विकून शौचालय बांधून दिले. त्यांच्यामुळे गाव हागणदारीमुक्त करून राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मलग्राम राष्ट्रीय पुरस्कार गावाला मिळवून दिला होता. तसेच यापूर्वी स्वखर्चाने लिंब, चिंच, वड, पिंपळ अशा विविध जातींच्या झाडांची सुमारे दीड दोन हजार रोपे गाव परिसरात लावली. तसेच स्वखर्चाने बोअर घेऊन त्यांना पाणी घालून संगोपन केले. या कार्याबद्दल जागतिक वनदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते शेळके छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे.