Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Marathwada › जुलैमध्ये लावणार २४ लाख वृक्ष

जुलैमध्ये लावणार २४ लाख वृक्ष

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:28PMहिंगोली : प्रतिनिधी

13 कोटी वृक्षलागवड अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात जुलैमध्ये 24 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 49 रोपवाटिकेत 45 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार सर्व विभागांना रोपांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी  वनविभागाच्या वतीने तयारी केली जात असल्याचे चित्र आहे.

वनविभागाला 9 लाख 51 हजार 318 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग 6 लाख 48 हजार, ग्रामपंचायत 5 लाख 54 हजार 288 तसेच इतर विभाग यामध्ये कृषी विभागातर्फे 2 लाख 10 हजार 270, जि.प.ग्राम विकासअविभाग 2 हजार 642, महसूल विभाग 3715, सार्वजनिक बांधकाम विभाग 8615, गृहविभाग 6240, राज्य राखीव पोलिस बलगट क्र. 12-6000, जलसंपदा विभाग 1810, उपनिबंधक सहकार व पणन विभाग 4620, शिक्षण संस्था 1465, उच्च व तंत्र शिक्षण विभाग 690, आदिवासी विकास विभाग 1605, सर्व आगारप्रमुख 835, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय 200, न्याय विभाग 170, महिला व बालविकास अधिकारी 175, मुख्याधिकारी हिंगोली तसेच कळमनुरी, वसमत, सेनगाव औंढा नगरपंचायत 7875 याप्रमाणे वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

वनविभागाच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी वने व वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी मागील 3 वषार्र्ंपासून वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जात आहे. 50 कोटी वृक्षारोपण व संगोपनाचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. त्यानुसार यावर्षी जिल्ह्यात 24 लाख 32 हजार 618 रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी वनविभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे.

जिल्ह्यातील 49 रोपवाटिकेमधून जवळपास 45 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. ही रोपे विविध विभागाला लागवडीसाठी जुलैमध्ये दिले जाणार आहेत. तसेच शेतकर्‍यांना रोपे लागवड करावयाची असल्यास अल्पदरात ती वन विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी शेतकर्‍यांनी वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी केले आहे.