Tue, Apr 23, 2019 09:50होमपेज › Marathwada › 22 जणांचे कुटुंब; कौतुकाचा विषय

22 जणांचे कुटुंब; कौतुकाचा विषय

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 10:47PMपरभणी : नरहरी चौधरी

सध्या धावपळीच्या जगात कुटुंबातील संपत चाललेला संवाद, आई-वडील आणि मुलांचे विभक्‍त होणे या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. विभक्‍तीकरणाची लाट अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहचली आहे, असे असताना गंगाखेड येथे 22 सदस्य असणारे धुळे कुटुंबीय गुण्यागोविंदाने राहताना दिसते.पितृसत्ताक पद्धतीचा सगळीकडे बोलबाला असताना धुळे कुटुंबाचे प्रमुख म्हणून काम पाहतात त्या 70 वर्षीय गंगाबाई विद्यासागरअप्पा धुुळे. गंगाबाईंना चार मुले आणि तीन मुली आहेत. या मुलांची लग्न झाल्यानंतर त्यांनी वेगळा संसार न थाटता एकत्रच राहणे पसंत केले. या चार मुलांना 9 मुले असून, त्यापैकी चौघांची लग्न झाली आहेत. थेट नातू, पणतू पाहण्याचे भाग्य आजीबाईंना लाभले आहे. याशिवाय त्यांच्या विवाहित मुली महिना दोन महिने माहेरी येत असतात. त्यामुळे त्यांचे घर नेहमी भरल्यासारखे असते.

त्यांचा मोठा मुलगा विश्‍वनाथअप्पा धुळे हे कुटुंंब चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावितात. त्यांच्या हाती घरातील कारभार सोडून बाहेरचे इतर व शेतीचा व्यवहार आहे. त्यांच्यापर्यंतच्या पिढीतील सर्वजण दहावीपर्यंतही शिकलेले नाहीत. पण पुढील पिढीतील मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले आहे. त्यामुळे प्राध्यापक, सॉफ्टवेअर इंजिनिअर, सी.ए., शिक्षिका म्हणून काही जण काम करतात. गंगाखेडातील नवामोंढा भागात या कुटुंबाचे भुसार मालाचे दुकान असून 8 एकरशेतजमीन आहे.  आजी व मोठ्या मुलाच्या सल्ल्यानेच आजही या कुटुंबाचा कारभार चालवला जात असल्याचे वास्तव कायम आहे. एकत्र आणि मोठ कुटुंब असल्यामुळे बाहेरून येणार्‍यांचे घरात स्वागतच असते. घरी कोणी ना कोणी राहत असल्याने घराला कुलूप लावण्याची वेळ येत नाही. घरातील प्रत्येकाला स्वातंत्र्य असले तरी एकमेकांना सांभाळून घेतले जात असल्याने आलेल्या संकटावर मात करता येते, असे धुळे यांनी सांगितले.