Wed, Mar 20, 2019 08:54होमपेज › Marathwada › बोंडअळीने २ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

बोंडअळीने २ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 25 2018 1:14AMपरभणी : प्रतिनिधी

पिकांवर  होणारे कीडहल्‍ले  ही बाब नैसर्गिक आपत्तीअंतर्गत समाविष्ट आहे. यामुळे कापूस पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या 3 लाख 51 हजार 326 शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतेच राज्याच्या महसूल व वनविभागाने याप्रकरणी शासन निर्णय निर्गमित केला असून यात कोरडवाहूकरिता 6 हजार 800 रुपये तर बागायतदारांसाठी 13 हजार 500 रुपयांची हेक्टरी मदत देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर केला आहे. 

राज्यात कापसावर 2017 च्या खरिपात बोंडअळीचा मोठा प्रार्दुभाव झाला होता. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल प्रशासनाने बांधावर जाऊन जीपीएस प्रणालीतून फोटो काढत पंचनामे केले. गावपातळीवरील सर्व माहितीची जमवाजमव केल्यानंतर 14 फेबु्रवारीला नुकसानाची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आपले नाव व क्षेत्राची माहिती आहे की नाही याची शहानिशा करता येणार आहे. तसेच 20 फेबु्रवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. याप्रकरणी 33 टक्क्यांपेक्षा अधिक बाधित क्षेत्रातील शेतकर्‍यांना शासनाकडून आता नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

अशी मिळणार भरपाई
प्रधानमंत्री पीकविमा योजनेखाली झालेल्या कापसाच्या पीक कापणी प्रयोगानुसार ज्या अधिसूचित विमा क्षेत्र घटकासाठी कापूस पिकाचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. केवळ अशाच मंडळातील सर्व कापूस उत्पादकांना कोरडवाहू-6800 तर बागायत क्षेत्राकरिता 13500 रुपये प्रतिहेक्टर आणि पेरणी क्षेत्राच्या मर्यादेत व अधिकत्तम 2 हेक्टरपर्यंत भरपाई मिळणार आहे. 
ज्या मंडळातील 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान आहे अशा शेतकर्‍यांना मदत मिळणार नाही. ही रक्‍कम संबंधिताच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या रकमेतून बँकेने कोणतीही कपात करू नये असेही कळविले आहे. ही कार्यवाही पूर्णपणे कृषी विभागामार्फत केली जाणार आहे.

परभणी जिल्ह्यात 2 लाख 33 हजार 403 हेक्टर क्षेत्रावर 3 लाख 51 हजार 326 शेतकर्‍यांनी कापसाची लागवड केली.  बोंडअळीच्या हल्ल्यात यापैकी 3 लाख 51 हजार 326 शेतकर्‍यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये 2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड केलेले 13 हजार 150 शेतकरी आहेत.  
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.