Sun, May 19, 2019 23:00होमपेज › Marathwada › हिंगोली जिल्ह्यात 9 वर्षांत 192 शेतकरी आत्महत्या

हिंगोली जिल्ह्यात 9 वर्षांत 192 शेतकरी आत्महत्या

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 12:23AMहिंगोली : गजानन लोंढे

सततचा दुष्काळ व नापिकीला कंटाळून नऊ वर्षांत हिंगोली जिल्ह्यातील तब्बल 192 शेतकर्‍यांनी मृत्यूस कवटाळले. त्यापैकी 144 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली, तर 44 प्रकरणे अपात्र ठरली. 2017 मधील चार प्रकरणांची फेरचौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. सर्वाधिक आत्महत्या सन 2016 मध्ये झाल्याची नोंद असून तो आकडा 49 असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसून येते. त्यापैकी 41 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे.

सन 2008 पासून हिंगोली जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले. सन 2008 मध्ये 12 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे होती. त्यापैकी दहा शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 लाखाची मदत देण्यात आली तर दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले. सन 2009 मध्ये 9 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली. त्यामधील केवळ 2 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली तर उर्वरित 7 प्रकरणे अपात्र ठरली. 2010 मध्ये केेवळ दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासन दरबारी झाली. त्यातील एका शेतकरी कुटुंबीयाला मदत देण्यात आली. 2011 मध्ये पाच शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या त्या पाचही शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली.

2012 मध्ये 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद असून त्यापैकी दोघा शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना शासनाची मदत देण्यात आली तर एक प्रकरण अपात्र ठरले. 2013 मध्ये दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे असून त्या दोन्ही शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली. 2014 पासून मात्र शेतकरी आत्महत्येच्या घटनेत मोठी वाढ झाली. 2014 मध्ये 31 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद असून त्यापैकी 25 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली तर सहा प्रकरणे अपात्र ठरली. 2015 मध्ये शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढून तो 41 वर गेला. त्यापैकी 34 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली तर उर्वरित 8 प्रकरणे फेटाळण्यात आले. 

2016 मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक 49 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली. त्यापैकी 41 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली तर 8 प्रकरणे अपात्र ठरली. 2017 च्या ऑक्टोबरअखेर 38 शेतकरी आत्महत्येची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली. त्यापैकी 27 शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली. 7 प्रकरणे फेटाळण्यात आली तर 4 प्रकरणे फेर चौकशीसाठी पाठविण्यात आली आहे.

चार वर्षांत 160 शेतकरी आत्महत्या ः 2013 पर्यंत शेतकरी आत्महत्येची प्रकरणे अत्यल्प होती. 2014 पासून मात्र शेतकरी आत्महत्येचे लोण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. 2014 मध्ये 31, 2015 मध्ये 41, 2016 मध्ये 49 तर 2017 मध्ये 38 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. कर्जमाफीनंतरही 9 शेतकर्‍यांनी मृत्यूस कवटाळल्याचा प्रकार समोर आला आहे.