Wed, Jul 08, 2020 03:39होमपेज › Marathwada › अपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत

अपघात विमा योजनेतून 175 शेतकर्‍यांना मदत

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 05 2018 10:48PMबीड : प्रतिनिधी

नैसर्गिक संकंटाने किंवा अपघाताने दगावलेल्या किंवा एक अवयव निकामी झालेल्या शेतकर्‍यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी आपघात विमा योजनेचा मोठा आधार मिळाला आहे. या योजनेतून आतापर्यंत 175 शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. यावर्षीही मदतीसाठी नऊ शेतकर्‍यांनी प्रस्ताव दिलेले आहेत.

 सर्पदंश अथवा विजेचा शॉक लागून शेतकरी दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. जिल्ह्यात वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. घरातील कर्ता पुरुष असा एकाएकी निघून गेल्यानंतर त्या कुटुंबावर बिकट वेळ येते. कुटुंबाचा सांभाळ, मुलांचे शिक्षण अशा एक ना अनेक समस्या समोर उभ्या ठाकतात.   

शेतकर्‍याचा नैसर्गिक संकटाने वा अपघाताने मृत्यू झाल्यास वा अपंगत्व आल्यास अशा शेतकर्‍यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास दोन लाख व एक अवयव निकामी झाल्यास एक लाखाची मदत केली जाते. या मदतीमुळे त्या-त्या कुटुंबास मोठा आधार मिळत आहे. 

2015-16 मध्ये यासाठी 235 शेतकर्‍यांचे प्रस्ताव आले होते. यातील 116 प्र्रस्ताव मंजूर करून त्यांना दोन कोटी 32 लाखांची मदत देण्यात आली आहे. यातील 101 प्रस्ताव हे नाकारण्यात आले आहेत. पाच प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. विमा कंपनीकडे पाच प्रस्ताव प्रलंबित आहेत. 2016-17 मध्ये या योजनेसाठी 171 प्रस्ताव आलेले आहेत. यातील 59 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. तर, कंपनीने 10 प्रस्ताव नाकारलेले आहेत. त्रुटी आढळलेले प्रस्ताव 10 आहेत. यामध्ये एक कोटी 18 लाखांची मदत करण्यात आली आहे. चालू वर्षी 2018 मध्ये अद्याप नऊ प्रस्ताव आलेले आहेत. यातील काही प्रस्तावात त्रुटी असून काही कंपनीकडे प्रलंबित आहेत. या योजनेतून शेतकर्‍यास आर्थिक मदत मिळत असल्याने बिकट परिस्थितीत ही योजना सामान्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. 

या कारणांसाठी दिली जाते मदत

या योजनेमध्ये रस्ते-रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून मृत्यू, साप अथवा विंचू चावून मृत्यू झाल्यास, नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्यास, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास, दंगलीमध्ये मृत्यू झाल्यास वा एखादा अवयव निकामी झाल्यास संबंधित शेतकर्‍यास अथवा त्याच्या वारसास एक ते दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 

शेतकरी कुटुंबासही मिळावी मदत

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ केवळ ज्याच्या नावावर सातबरा आहे, अशाच शेतकर्‍यास मिळते. अनेक शेतकरी कुटुंबामध्ये वडिलांच्या-अजोबांच्या नावावर जमीन आहे. जमिनीची खातेफोड मुले मोठ-मोठी झाली तरी केली जात नाही. अशावेळी कर्त्या शेतकरी मुलाचा शेती कसताना अपघात होतो अथवा मृत्यूही होता. तेव्हा त्याच्या नावावर शेती नसल्याची बाब समोर करीत अपघात विमा दिला जात नाही. त्यामुळे शेतकर्‍याच्या मुलासही या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.