Tue, Apr 23, 2019 02:22होमपेज › Marathwada › बियाणांची १५ टक्के पाकिटे होणार उपलब्ध

बियाणांची १५ टक्के पाकिटे होणार उपलब्ध

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:40PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने यावर्षीकरिता खरीप हंगामासाठी 1 लाख 65 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणार आहे. यात 9 लाख 7 हजार 500 सरकी बियाणांच्या पाकिटांची आवश्यकता असल्याचा प्रस्तावित अहवाल सादर केलेला आहे. यापैकी केवळ आतापर्यंत 1 लाख 25 हजार सरकी बियाणांची पाकिटे बाजारात दाखल झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात 15 टक्के पाकिटे उपलब्ध होणार आहे, पण कापसाची लागवड करण्याकडे पाहिजे त्या प्रमाणात शेतकर्‍यांचा कल नसल्याचे दिसते.

2017-18 खरीप हंगामाकरिता 5 लाख 217 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी केवळ 1 लाख 91 हजार 9 हेक्टर क्षेत्रावरच कापूस या पिकाची लागवड प्रस्तावित केली होती, पण गतवर्षी या हंगामाच्या सुरुवातीस समाधानकारक पडलेल्या पावसाच्या भरवशावर या प्रस्तावित क्षेत्रापैकी तब्बल अडीच लाख हेक्टरवर जिल्हाभरातील शेतकर्‍यांनी कापूस या पिकाची लागवड केली होती, पण बोंडअळीचा प्रादुर्भाव आल्याने बहुतांश शेतकर्‍यांच्या हातातून हे पीक गेले. पहिल्याच वेचणीनंतर या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. या नुकसानीसाठी आंदोलनेही झाली. 

यामुळे बियाणे पाकिटे बाजारात उपलब्ध करण्याचे नियोजन कृषी विभाग करत असताना शेतकरी या पिकाची कितपत लागवड करतात? हे खरीप पेरणीतच पाहावयास मिळणार आहे. गतवर्षी बोंडअळीने कापूस या पिकाचे मोठे नुकसान झाले. पहिल्या वेचणीतच हा रोग जडल्याने शेतकर्‍यांच्या हाती काहीही उत्पादन आले नाही. यामुळे शेतकरी यावर्षी बियाणे पाकिटांची खरेदी करताना दिसत नाही.

महत्त्वाच्या पाच कंपन्यांचीच पाकिटे उपलब्ध ः सध्या खरिपासाठी शेतकर्‍यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत. यावर्षी शेतकर्‍यांमध्ये कापूस या पिकाबाबत घबराट निर्माण झाल्याने नेहमी उन्हाळ्यात होणारी लागवड झाली नाही, पण पेरणीबरोबर लागवड होणार असल्याने बाजारात शुक्रवारपर्यंत महिको, अंकुर, अजित, राशी, ग्रीन गोल्ड या महत्त्वाच्या कंपन्यांसह इतरची 1 लाख 25 हजारांच्या आसपास पाकिटे दाखल झाली.