Mon, Nov 19, 2018 18:58होमपेज › Marathwada › लातुरात मध्यान्ह भोजनातून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

लातुरात मध्यान्ह भोजनातून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा

Published On: Jul 04 2018 9:15PM | Last Updated: Jul 04 2018 9:30PMलातूर : प्रतिनिधी 

जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद  शाळेतील १४१ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून  विषबाधा झाल्‍याचे समोर आले आहे. वाढवणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करुन त्यांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी गावडे यांनी दिली.

मंगरुळ येथे १ ली ते ७ वी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. तेथे  विद्यार्थ्यांना दुपारी मध्यान्ह भोजन दिले जाते. बुधवारीही ते देण्यात आले. जेवन झाल्यानंतर सहा विद्यार्थ्यांना मळमळ होऊन उलटल्या झाल्या. त्यानंतर तेथील सर्वच विद्यार्थ्यांना मळमळ व डोकेदुखी सुरू झाली. यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांना तातडीने तेथून जवळ असलेल्या वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. खाटांची संख्या कमी असल्याने त्यांना संतरंज्या अंथरण्यात आल्या. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने अन्य प्राथमिक केंद्रांच्या डॉक्टरांनाही बोलावण्यात आले.

उपचारानंतर काहीकाळ त्यांना केंद्रात ठेवून नंतर सुट्टी देण्यात आली. विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी  प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली होती. विषबाधेचे नेमके कारण समजू शकले नाही परंतु, ती पिण्याच्या  पाण्यातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.