होमपेज › Marathwada › 14 फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन डे नव्हे मातृ-पितृ पूजन दिवस 

14 फेब्रुवारी व्हॅलेन्टाईन डे नव्हे मातृ-पितृ पूजन दिवस 

Published On: Feb 14 2018 2:53AM | Last Updated: Feb 14 2018 2:41AMबीड : प्रतिनिधी 

 पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचा अंगीकार करावा. 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेन्टाईन डे साजरा न करता ज्यांनी आपल्याला हे जग दाखवले, ज्या आईने आपल्याला बोट धरून चालायला शिकविले, वडिलांनी मेहनतीने जगाची ओळख करून दिली. प्रेम दिले तो दिवस मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करावा असे आवाहन श्री योग वेदांत सेवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 

पाश्‍चात्य संस्कृतिचे आक्रमण म्हणून गेल्या काही वर्षांपासून देशात व्हॅलेन्टाईन डे उत्साहात साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. श्री योग वेदांत सेवा समितीने या गोष्टीला विरोध केला आहे. समितीच्या मते भारतीय संस्कृतिचे जतन करण्यासाठी आणि तरुण-तरुणींना योग्य दिशा देण्यासाठी 14 फेब्रुवारी हा दिवस आपल्या आई-वडिलांसाठी अर्पित करावा. माता-पित्याचे या दिवशी पूजन करावे. प्रेम हे पवित्र असते तेव्हा जगात आई-वडील आणि गुरू शिवाय असे पवित्र प्रेम मिळू शकत नाही. युवक-युवतींनी व्हॅलेन्टाईन डे ला प्रखर विरोध करून मातृ-पितृ पूजन करावे. असेही श्री योग वेदांत सेवा समितीच्यावतीने सांगण्यात आले. 

शहरातून रॅली
बीड शहरातून सिद्धीविनायक संकूल येथून सुभाष रोड, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा रोड, बशीरगंज, भाजी मंडई येथून प्रचार रॅली काढण्यात आली. युवक-युवतींमध्ये आपल्या माता-पित्यांबद्दल प्रेम व आदर ही भावना जागृत व्हावी, पाश्‍चात्य संस्कृती टाळत भारतीय संस्कृतीचे जतन करावे, व्हॅलेनटाईन डे साजरा न करता आई-वडिलांबद्दल प्रेम कृतज्ञता दिवस म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस साजरा करावा या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये युवक-युवती, महिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.