Tue, Mar 26, 2019 07:46होमपेज › Marathwada › प्रकल्पांमध्ये उरला १३ टक्के पाणीसाठा

प्रकल्पांमध्ये उरला १३ टक्के पाणीसाठा

Published On: May 28 2018 1:52AM | Last Updated: May 27 2018 10:34PMबीड : प्रतिनिधी

मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील 144 प्रकल्पांमधील पाणीसाठा 13 टक्क्यांवर आला आहे. बाष्पीभवन आणि सिंचनासाठी पाणीउपसा झाल्याने साठा झपाट्याने कमी झाला आहे. 144 प्रकल्पांमध्ये 2 मोठे, 16 मध्यम, 126 लघु प्रकल्प आहेत. विशेष म्हणजे परतीच्या पावसाने बहुतांश प्रकल्प तुडुंब भरले होते. 

जिल्ह्यातील असलेल्या सर्व प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता 1137 दलघमी इतकी आहे. या तुलनेत आजघडीला या प्रकल्पांमध्ये केवळ एकूण 355.662 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक असून यापैकीही फक्त 117.296 दलघमी इतकाच साठा हा वापरण्यायोग्य आहे. महिनाभरापूर्वी हा साठा 250 दलघमीच्या घरात होता. म्हणजेच अवघ्या महिन्यात तब्बल अर्ध्यापेक्षाही जास्त पाणीसाठा संपल्याचे समोर आले आहे. माजलगाव या मोठ्या धरणात आजघडीला केवळ 12.28 टक्के तर मांजरा या अन्य मोठ्या प्रकल्पात सध्या 17.51 टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होत असून यामुळे झपाट्याने पाणीसाठा आटत चालला आहे.

जिल्ह्यात माजलगाव व मांजरा हे दोन मोठे प्रकल्प तर बिंदुसरा, सिंदफणा, बेलपारा, महासांगवी, मेहेकरी, कडा, कडी, रुटी, तलवार, कांबळी, वाण, बोरणा, बोधेगाव, सरस्वती, कुंडलिका, वाघेबाभुळगाव असे 16 मध्यम प्रकल्प आहेत. याशिवाय 126 लघु प्रकल्प आहेत. गतवर्षी जिल्ह्याने पावसाची 666 मिमीची वार्षिक सरासरी ओलांडली. जिल्ह्यात 105 टक्के इतका पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच तलाव, धरणे तुडुंब भरले. मात्र यानंतर अवघ्या सहा महिन्यांमध्येच पाण्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा मात्र 13 टक्के इतका खाली आला आहे. 

77 प्रकल्प मृतसाठ्यात

पावसाळ्याच्या शेवटीला सर्व तुडुंब भरलेले प्रकल्प आजघडीला आटत चालले आहेत. सध्या एकाही प्रकल्पात 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उरलेला नाही. आजघडीला 15 प्रकल्पांमध्ये 25 ते 50 टक्क्यांदरम्यान पाणीसाठा आहे. याशिवाय 46 प्रकल्पांतील पाणीसाठा हा 25 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. 77 प्रकल्पातील पाणी हे मृतसाठ्यात म्हणजेच जोत्याखाली गेला आहे. याशिवाय जिल्ह्यातील 6 प्रकल्प आजघडीला अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. प्रकल्प कोरडे पडले असले तरी गतवर्षीच्या पावसाने पाणीपातळी चांगली वाढली होती. त्यामुळे बोअर आणि विहीरींना बर्‍यापैकी पाणी उपलब्ध आहे. यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी असून आता पंधरा दिवसांत पाऊस येणे अपेक्षित आहे.