होमपेज › Marathwada › मराठवाडा, विदर्भात पावसाचे 11 बळी

मराठवाडा, विदर्भात पावसाचे 11 बळी

Published On: Aug 22 2018 1:53AM | Last Updated: Aug 22 2018 1:53AMऔरंगाबाद/नागपूर : प्रतिनिधी

मराठवाडा व विदर्भातील काही भागांत मुसळधार पावसाने 11 जणांचे बळी घेतले आहेत. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना धुवाँधार पावसाचा तडाखा बसला आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने मराठवाड्यात पुन्हा जोरदार धडक मारली. मराठवाड्यातील 425 मंडलांपैकी तब्बल 82 मंडलांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. नांदेड जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने सहा जणांना जीव गमवावा लागला असून, यात सहा वर्षांच्या एका चिमुकलीचाही समावेश आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील वडगाव येथील मारुती संग्राम बिरकुरे (वय 70) आणि हदगाव तालुक्यातील कवाना येथील भारत हरिभाऊ तोरकड (42) हे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले. नायगाव तालुक्यातील बरबडा येथील दिवटे कुटुंबीयांची तवेरा गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. यात गंगाराम मारुती दिवटे (40), पारुबाई गंगाराम दिवटे (35) आणि त्यांची सहा वर्षांची अनुसया ही मुलगी मृत पावली. नायगाव तालुक्यातील बेंद्री गावातील विनायक बालाजी गायकवाड (30) हे पुरात वाहून गेल्याने मरण पावले. 

76 तालुक्यांपैकी नांदेडमधील मुखेड, देगलूर आणि किनवट हे तीन तालुके वगळता इतर सर्व 12 तालुक्यांत आणि हिंगोलीतील पाचपैकी कळमनुरी, औंढा नागनाथ आणि हिंगोली या तीन तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 58 आणि हिंगोलीतील 12 मंडलांत 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील 3, परभणी 7, तसेच जालना आणि बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एका मंडलात मुसळधार पाऊस झाला आहे.

विदर्भात मुसळधार; 5 जणांचा मृत्यू

नागपूरसह विदर्भात पावसाने कहर केला असून, गेल्या 24 तासांत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यात छत कोसळल्याने तिघांचा, तर नागपुरात एका बालकाचा ओढ्यात वाहून, तर पारशिवनी तालुक्यात एका युवकाचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. पावसाने हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली आल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.   

सोमवारी दुपारपासून जोर धरलेल्या पावसाची संततधार आजही कायम आहे. हवामान विभागाने सोमवारी पावसाबाबत ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी केला होता.नागपूर शहरात, तसेच जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. परिणामी, जिल्ह्यातील मौदा तालुक्यात ‘सांड’ आणि ‘सूर’ नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदीशेजारील गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.मौदा तालुक्यातील अरोली गावातही सूर नदीचे पाणी शिरले आहे. पारशिवनी तालुक्यात आमडी नाल्यामध्ये सुरेश सातपैसे नावाची 42 वर्षीय व्यक्‍ती वाहून गेली आहे. 

छत कोसळून तिघांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील राजेदहेगाव येथील पोलिसपाटील मधुकर ढोबळे यांच्याकडे शेतीकामासाठी वार्षिक रोजंदारीवर नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील निलज खंडाळा येथील शेतमजूर निवासी मुक्‍कामी होते. सोमवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे ते ज्या घरात वास्तव्यास होते त्याचे छत रात्रीच्या सुमारास ते झोपेत असताना पडल्याने त्यात दबून सुकरू दामाजी खंडाते, पत्नी सारिका सुकरू खंडाते व 3 वर्षीय मुलगी नंदिनी सुकरू खंडातेचा मृत्यू झाला. भंडारा, मोहाडी व लाखनी तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

8 वर्षाचा मुलगा वाहून गेला 

नागपूरजवळील ओढ्यातील प्लास्टिक बॉल घेण्याचा प्रयत्न करणारा चिमुकला वाहून गेला. अदनान कुरेशी असे या चिमुकल्याचे नाव आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम, बुलडाणा आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसाने चांगलीच बॅटिंग केली आहे.