Mon, Jun 17, 2019 02:42होमपेज › Marathwada › जि. प. मधील 11 शिपाई बनले आरोग्य सेवक 

जि. प. मधील 11 शिपाई बनले आरोग्य सेवक 

Published On: Apr 26 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 11:16PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शिपाई पदावरील 11 कर्मचार्‍यांना समायोजन प्रक्रियेतून आरोग्य सेवक या पदावर नुकतीच बढती देण्यात आली आहे. या नियुक्‍तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी नुकतेच काढले आहेत. 

जिल्हा परिषदेच्या विभागांतर्गत गट ड या पदावर कार्यरत असणार्‍या परिचर पदावरील तब्बल 11 कर्मचार्‍यांचे समायोजन करण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांची नियुक्‍ती ही आरोग्य सेवक (पुरूष - 40 टक्के सरळसेवा) या पदावर करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. या कर्मचार्‍यांना विविध आरोग्य केंद्रांतर्गत हजर होवून कामकाज करण्याचेही कळवण्यात आले आहे. ही नियुक्‍ती गट क पदावरील उपलब्धतेत असणार्‍या पदानुसार करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. ही नोकरी जर संबंधितांना सोडावयाची असल्यास त्यांनी एक महिना आधी नोटीस द्यावी अथवा एक महिन्याच्या मुळ वेतनाएवढी रक्‍कम जिल्हा निधीत जमा करणे बंधनकारक केले आहे. तसेच पोलीस विभागाच्या रेकॉर्डनुसार संबंधितांविरूध्द कोणत्याही प्रकारचे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आढळल्यास त्यांना तात्काळ सेवेतून काढले जाणार असल्याचेही या आदेशात नमुद केले आहे. या पदावर केलेली नियुक्‍तीही त्यांनी डावलल्यास त्यांचा फेरनियुक्‍तीसाठी विचार केला जाणार नाही. तसेच संबंधितांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र हे नियुक्‍तीनंतरच्या 6 महिन्याच्या कालावधीत सादर करणे आवश्यक असल्याचीही माहिती मिळाली आहे. 

अशी केली जाते  सरळसेवेने नियुक्‍ती

गट क मधील पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्‍तीसाठी पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांना पदांच्या उपलब्धतेअभावी गट ड मधील परिचर पदांवर नियुक्‍ती दिली जाते. यानंतर पद उपलब्ध झाल्यास गट क मधील पदावर त्यांना प्राधान्याने नियुक्‍ती देण्यात यावी, असे शासन आदेश आहेत. यावेळी गट ड मधील पदावर अनुकंपा योजनेअन्वये नियुक्‍ती देण्याचे आदेशात नमूद करणे बंधनकारक केले आहे. तसे करण्यात आले तरच गट क मधील पदावर ही नियुक्‍ती करता येते. 

Tags : Marathwada, 11, Peon, become, health, Servant