Tue, Apr 23, 2019 09:51होमपेज › Marathwada › 300 विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल रखडला

300 विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल रखडला

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 29 2018 12:12AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शाळेने बोर्डात 20 विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क न भरल्याने शाळेच्या तब्बल 300 विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल माध्य. व उच्च. माध्य. शिक्षण मंडळाने राखीव ठेवले आहेत. त्याचा मनस्ताप मात्र विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च-2018 शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (दहावी) निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. त्याचे मूळ गुणपत्रक 22 जून रोजी वाटप करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील सिरसम येथील प्रथमेश माध्य. विद्यालयातील 320 विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र दहावीच्या परीक्षेसाठी मंडळात दिले होते. मात्र काही कारणास्तव 20 विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी 5 फेबु्रवारी 2018 रोजी विद्यालयाने बोर्डाकडे केली. मात्र, बोर्डाने या 20 विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र का रद्द करत आहात, या संदर्भात खुलासा द्यावा असे पत्र मुख्याध्यापकांना 20 फेबु्रवारी रोजी पाठविले. मात्र, त्यावर मुख्याध्यापकांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा न कळवल्याने पुन्हा दि. 8 मार्च रोजी खुलासा द्यावा असे पत्र मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले. खुलासा न आल्यास विद्यालयातील विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात येतील, असेही त्यात म्हटले होते. त्यावर विद्यालयाने 31 मार्च रोजी बोर्डाला खुलासा कळवला, त्यात सांगण्यात आले की, सदर 20 विद्यार्थ्यांनी शाळेत परीक्षा शुल्क भरलेले नाही, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र रद्द करण्यात यावे. त्यानंतर या वीस विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क न भरल्याने बोर्डाने त्यांचे प्रवेशपत्र दिले नाही व त्या विद्यार्थ्यांनी परीक्षाही दिली नाही. मात्र, आता बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर या विद्यालयातील 300 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. विद्यालयाने निकालाची मागणी केली असता बोर्डाकडून, 20 विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्राचे परीक्षा शुल्क 2 लाख 8 हजार 500 रुपये भरल्यानंतरच विद्यालयाच्या 300 विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र 300 विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डाने राखून ठेवल्याने या विद्यार्थ्यांना कोणतीही चूक नसताना मनस्ताप सहन करावा लागत आहे.