Thu, Aug 22, 2019 10:41होमपेज › Marathwada › शिवार साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडीने वेधले लक्ष

शिवार साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडीने वेधले लक्ष

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:25PMअहिल्याबाई होळकर साहित्यनगरी, 
माजलगाव : सुभाष नाकलगावकर

10 व्या शिवार साहित्य संमेलनाची सुरुवात मंजरथ येथे रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान ग्रंथ दिंडीने झाली. या दिंडीत लेझीम पथक, बँड पथक चिमुकल्या मुलींनी केलेली मराठमोळी वेशभूषा हे प्रमुख आकर्षण ठरले. मराठवाडा साहित्य परिषद आणि मंजरथ ग्रामस्थ यांच्यावतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील साहित्यिकांना चालना मिळण्यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात शिवाराशी निगडित विविध साहित्यिक बाबी मांडल्या जातात. ग्रामीण कथाकार साहित्यिकांच्या दृष्टीने हे संमेलन एक चांगले व्यासपीठ आहे. माजलगाव शहरात झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात शिवार नावाची विशेष पुरवणी काढण्यात आली होती. या पुरवणीवरून शिवार असे नाव या साहित्य संमेलनास देऊन त्याची सुरुवात 2009 पासून करण्यात आली. यावर्षी तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मांजरथ येथील अहिल्याबाई होळकर या साहित्य नगरीत हे संमेलन पार पडत आहे.

रविवारी सकाळी 9 च्या सुमारास गोदातीरापासून ग्रंथ दिंडीचे उद्घाटन धार्मिक ग्रंथकार कल्याण बोटे यांच्या हस्ते करण्यात आली. गावातून काढण्यात आलेल्या या दिंडीतील लेझीम पथक, ढोल पथक आणि मराठमोळ्या वेशातील मुले यामुळे वातावरण भारावले होते. ग्रंथ दिंडीत वारकरी मंडळ टाळ मृदंगाच्या गजरात तर मुली डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. दिंडीत स्वागत सरपंच ऋतुजा अनंदगावकर, मसापाचे कार्यवाह प्रा. डॉ.भाऊसाहेब राठोड, डॉ. रमेश गटकळ, बालासाहेब झोडगे, प्रा. उमेश साडेगावकर, राजेन्द्र आंनदगावकर, सतीश आस्वले, निवृती खरात, मंगेश उपाध्ये यांच्यासह नागरिकांनी केले.