Thu, Feb 21, 2019 11:26होमपेज › Marathwada › विधानपरिषदेसाठी लातुरात १०० टक्के मतदान

विधानपरिषदेसाठी लातुरात १०० टक्के मतदान

Published On: May 21 2018 7:20PM | Last Updated: May 21 2018 7:19PMलातूर : प्रतिनिधी

उस्मानाबाद, लातूर व बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी लातूर जिल्ह्यात १०० टक्के मतदान झाले. सर्व ३५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता निकालासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही निवडणूक अटीतटीची व प्रतिष्ठेची करण्यात आली होती.

भाजपाने नगरसेवकांना गोवा सहलीवर तर जिल्हा परिषद सदस्यांना पुण्याला पाठवले होते. सोमवारी त्यांचे आपापल्या मतदान केंद्रावर आगमन झाले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही मतदान केले. लातूर जिल्ह्यात ३५३ पैकी १६७ पुरुष तर १८६ स्त्री मतदार आहेत. दहा तहसील कार्यालयात मतदान केंद्र होती. मेटल डिटेक्टरच्या साह्याने मतदारांची तपासणी करुन त्यांना मतदान केंद्रात सोडण्यात येत होते. सर्वांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर होती.

डमी मतदारांवर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बैठकीतील इतिवृत्तावर केलेल्या स्वाक्षरीचे नमुनेही ओळख पटवण्यासाठी केंद्रावर ठेवण्यात आले होते. याशिवाय याच हेतुसाठी संबधित स्थानिक स्वराज्य संस्थातील काही कर्मचारीही केंद्रावर नियुक्त करण्यात आले होते. चोख पोलिस बंदोबस्तासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुरेसा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

तालुकानिहाय मतदारसंख्या

लातूर ८६, उदगीर ५१, औसा ३३, अहमदपूर ३३, निलंगा ३३, चाकूर २५, रेणापूर २४,  जळकोट २३, देवणी २३, शिरुर अनंतपाळ २२

Tags :latur, election, legislative council election, maharashtra, voting