Wed, Mar 20, 2019 08:30होमपेज › Marathwada › कपिलधार विकासासाठी दहा कोटींचा निधी मंजूर

कपिलधार विकासासाठी दहा कोटींचा निधी मंजूर

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 12:40AMबीड : प्रतिनिधी

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे कपिलधार तीर्थक्षेत्र विकासाला राज्य सरकारने  दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून विविध विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. गत काही वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लागणार असल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

राज्यातील ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  मंत्रालयात झाली. यात राज्यातील इतर तीर्थक्षेत्रा बरोबरच कपीलधार तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या तीर्थक्षेत्राच्या  ठिकाणी स्वच्छतेवर भर देण्यात यावा, या ठिकाणी मंजूर झालेला निधी हा घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा यावर जास्तीत जास्त खर्च करावा, असे निर्देश देत राज्यातील सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या सुमारे 99 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. शिखर समितीच्या या बैठकीत टाकळघाट (नागपूर), कपिलधार (बीड), श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर (जालना), आमला (अमरावती), श्रीक्षेत्र कोंडेश्वर (अमरावती), संत गाडगे महाराज जन्मभूमी (शेंडगाव, जि. अमरावती) या सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली.  यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार रावसाहेब दानवे, आमदार रवी राणा, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन उपस्थित होते.

अशी होणार कामे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्रीक्षेत्र कपिलधार, जि. बीड  येथे 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून  रस्ता, भिंत, सुशोभिकरण, भक्तनिवास, पाणीपुरवठा, अन्नछत्र सभागृह, संरक्षक भिंत, स्वच्छता गृहे, सभामंडप सजावट आदी कामे होणार आहेत.