Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Marathwada › टायर फुटून जीप पलटी; १ ठार, ४ जखमी

टायर फुटून जीप पलटी; १ ठार, ४ जखमी

Published On: May 06 2018 10:31PM | Last Updated: May 06 2018 10:30PMउमरगा : प्रतिनिधी

लग्नसोहळा आटोपून गावाकडे परतत असताना क्रुझर जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात एकजण ठार तर चार जण जखमी झाले. करजगाव जवळ आज रविवार (दि.०६) दुपारी चार च्या सुमारास ही दुदैवी घटना घडली. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जखमींना सोलापूरला हलविण्यात आले.  

याबाबतची अधिक माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील माकणी येथील अर्जुन बापूराव जाधव यांच्या मुलाचे उमरगा तालुक्यातील आलूर येथे लग्न होते. या लग्नासाठी माकणी येथील वऱ्हाड जीपने (क्रमांक एमएच १३ एसी ५७४५) दहा जण गेले होते. लग्नसोहळा आटोपून गावाकडे परत येत असताना दुपारी चारच्या सुमारास लोहारा तालुक्यातील करजगाव जवळ जीपचे मागील टायर फुटले. टायर फुटताच गाडी रस्त्याच्या कडेच्या खड्डयात पलटी झाली.

यात वैजिनाथ पंढरपुरे(६५), दिनकर रघुनाथ ओवांडकर (५५), विश्वनाथ भीमराव पवार (५०), शिवराज श्रीकांत धोत्रे (१४) रा. सर्व माकणी व इरशाद महमद पटेल (२५) रा. गुबाळ हे जखमी झाले. यातील गंभीर जखमी असलेले वैजिनाथ पंढरपूरे यांचा उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दिनकर ओवांडकर, शिवराज धोत्रे, इरशाद पटेल यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर विश्वनाथ पवार यांच्यावर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.