Sat, Sep 22, 2018 14:52होमपेज › Marathwada › राहुलचा ऑस्ट्रेलियात डंका

राहुलचा ऑस्ट्रेलियात डंका

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMपाटोदा : महेश बेदरे

राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीच्या आखाड्यात गुरुवारी पाटोद्याचा सुपुत्र राहुल आवारे याने बीड जिल्ह्याची मान उंचावली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुल आ वारेने कुस्तीत सुवर्णपदक जिंकले. राहुलने विजय मिळवताच संपूर्ण पाटोदा शहरात आपल्या या कतृर्र्त्ववान सुपुत्राच्या विजयाचा विजयोत्सव साजरा केला. राहुलच्या विजयाने पाटोदा शहराचे नाव जागतिक पातळीवर गेले असून विजयाचे वृत्त धडकताच पाटोदा शहरात दिवाळी साजरी करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाज करत पाटोद्यात विजयोत्सव साजरा करण्यात आला.

राहुलच्या शाळेत जल्लोष
राहुलचे 5 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण ज्या पाटोदा येथील भामेश्‍वर विद्यालयात झाले तेथे ही त्याचे शिक्षक व विद्याक्षर्यांनी आनंदोत्सव साजरा केला. राहुल याच शाळेत शिक्षण घेत असताना त्याने प्रथम रांची येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते त्यावेळीच राहुल एकदिवस जगज्जेता होणार असल्याचा विश्‍वास आम्हाला होता, असे मुख्याध्यापक  एल. आर. जाधव यांनी सांगितले.

राहुलच्या तालमीत आनंदोत्सव
पाटोदा चुंभळी फाटा येथे राहुलचे वडील पैलवान बाळासाहेब आवारे यांची तालिम आहे. त्या ठिकाणी ते आपल्या दोन कर्तृत्ववान सुपुत्रांप्रमाणेच म्हणजेच राहुल व गोकुळप्रमाणेच इतरही पैलवान घडवण्याचे कार्य करतात. मागील दोन दिवसांपासून त्या ठिकाणी राहुलच्या यशासाठी होमहवन व प्रार्थनाही सुरू होत्या. अखेर राहुलने सुवर्ण पदकाला गवसणी घातली व या ठिकाणी एकच जल्लोष झाला. राहुल चे वडील बाळासाहेब आवारे व बंधू गोकूळ आवारे यांना आनंदाश्रू आवरता येत नव्हते.

पोरगा लै मेहनती, ऑलिंपिकही जिंकणार
आमचा पोरगा (राहुल) लै मेहनत करतो, त्यो जिंकावा यासाठी आम्ही तालमीतच दोन दिवसांपासून हनुमान पूजा व होमहवन सुरू केले होते. आता त्यो ऑलिंपिकही नक्कीच जिंकणार. 
- बाळासाहेब आवारे - (राहुलचे वडील)