Tue, Jul 23, 2019 06:38होमपेज › Konkan › जि.प. अध्यक्षपदी स्वरूपा साळवी

जि.प. अध्यक्षपदी स्वरूपा साळवी

Published On: Jul 10 2018 10:47PM | Last Updated: Jul 10 2018 10:40PMरत्नागिरी : प्रतिनिधी  

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी लांजाच्या स्वरूपा साळवी यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब बेलदार यांनी ही निवड जाहीर केली. इतर मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी अडीच वर्षांच्या आरक्षणात पहिल्या सव्वा वर्षासाठी स्नेहा सावंत यांना संधी मिळाली. त्यानंतर पुढील सव्वा वर्षासाठी नवनिर्वाचित अध्यक्षा स्वरूपा साळवी काम पाहणार आहेत.

जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे पूर्ण बहुमत आहे. एकूण 55 सदस्यांपैकी शिवसेनेचे 39 सदस्य आहेत. पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. यानुसार शिवसेनेच्या नेत्यांनी पहिले सव्वा वर्षे स्नेहा सावंत यांना या  पदासाठी निवडले. त्याचवेळी पुढच्या सव्वा वर्षांसाठी स्वरुपा साळवी यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे या निवडीसाठी पक्ष प्रमुखांची मंजुरी सव्वा वर्षांपूर्वीच घेण्यात आली होती. 

पहिले सव्वा वर्ष संपल्यानंतर स्नेहा सावंत यांनी गेल्याच महिन्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त पदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. स्वरुपा साळवी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी आ. राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, गटनेते उदय बने, मावळते प्रभारी अध्यक्ष संतोष थेराडे आदी उपस्थित होते.