Thu, Mar 21, 2019 11:14होमपेज › Konkan › जयगड-डिंगणी रेल्वेचे काम रोखले

जयगड-डिंगणी रेल्वेचे काम रोखले

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:04PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाच्या अधिकार्‍यांकडून केवळ आश्‍वासने देऊन वारंवार फसवणूक होत असल्याने आक्रमक झालेल्या देऊड-चिंचवाडी ग्रामस्थांनी अखेर शनिवारी सकाळी देऊड येथील बोगद्याजवळ काम बंद पाडले.

जयगड-डिंगणी रेल्वे मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या प्रकल्पाचे अधिकारी ग्रामस्थांशी योग्य संवाद साधत नाहीत. त्याचबरोबर ग्रामस्थांना खोटी आश्‍वासने देत असल्याचा आरोप होत आहे. वारंवार सुरू असलेल्या या अन्यायामुळे देऊड-चिंचवाडी ग्रामस्थांना रेल्वेचे काम बंद पाडावे लागले आहे.

देऊड-चिंचवाडीमध्ये 26 घरे आहेत. या जागेच्या सात-बारावर मूळ मालकाचे नाव आहे. मात्र, गेल्या अनेक पिढ्या या जागेत ही 26 घरे आहेत. या जागेत नियमितपणे त्यांची वहिवाटही आहे. या जागेवर त्यांचे नाव नाही, याचा फायदा या प्रकल्प अधिकार्‍यांनी घेतला असून ग्रामस्थांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या 26 जणांची सात-बारावर नावे नाहीत हे हेरून या जागेच्या सात-बारावर असलेल्या व्यक्‍तींसोबत त्यांनी खरेदीखत केले. मात्र, अनेक वर्षे वहिवाट असूनही त्यांचा हक्‍क नाकारला जात आहे. प्रकल्प अधिकार्‍यांकडून मात्र या 26 जणांचा या जागेशी काहीच संबंध नाही, अशा प्रकारचा प्रचार केला जात आहे.

महसूल खात्याचाही या बाधितांना फटका बसत आहे. पूर्वी सातबारावर घरे, गोठा यांची असलेली नोंद महसूल खात्याने अचानक कोरी करून टाकली आहे. यामुळे या गरीब कुटुंबांची गळचेपी होत आहे. या प्रकल्पातील बोगदा चिंचवाडीच्या खालून जात आहे. हा बोगदा सुरूंग लावून काढण्यात येत असल्याने त्याचे धक्के हे वाडीतील घरांना बसत आहेत.

तीन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे अधिक क्षमतेने सुरूंग स्फोट झाल्याने घरांना तडे जात होते. यावेळी रेल्वे प्रकल्प अधिकार्‍याने ग्रामस्थांची समजूत काढून त्यांना घरांना प्‍लास्टर करून देतो, असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात घरातील तडे गेलेल्या भागामध्ये सिमेंट भरून बोळवण केली.

पुन्हा जास्त क्षमतेने सुरूंग स्फोट होऊ लागल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या वाडीतील घरांना पुन्हा तडे जात आहेत. प्रकल्प अधिकार्‍यांनी आश्‍वासन देवून भरलेल्या तड्यांनाही पुन्हा भेगा जात आहेत. त्यावरून या सुरूंगांची क्षमता लक्षात येते. भयभीत होऊन राहणार्‍या ग्रामस्थांना  शासकीय यंत्रणा सापत्न वागणूक देत असून यामुळे ग्रामस्थांना अडचणी निर्माण होत आहेत. शासनाची साथ मिळत नसल्याने ग्रामस्थांवर एकप्रकारे संकटच कोसळले आहे. आता न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

ठेकेदार कंपनी अधिकार्‍यांकडून अरेरावी

ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांकडून स्थानिकांवर अरेरावी केली जात आहे. येथील ग्रामस्थांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अधिकच संतापाची लाट पसरली आहे. या सर्व गोष्टींमुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले असून त्यांनी शनिवारी सकाळी ठेकेदार कंपनीचे काम रोखले आहे. या वाडीतील महिला, पुरूष, मुले सर्वच जण या बोगद्याजवळ येवून बसले असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय काम करू देणार नाही, अशी भूमिका या सर्वांनी घेतली आहे.