Tue, Jul 16, 2019 10:03होमपेज › Konkan › ...अन्यथा 31 रोजी महिलांचे तीव्र आंदोलन

...अन्यथा 31 रोजी महिलांचे तीव्र आंदोलन

Published On: Jan 23 2018 10:24PM | Last Updated: Jan 23 2018 9:44PMसावंतवाडी : प्रतिनिधी

शहरातील अवैध धंदे व गांजा आदी अंमली पदार्थांच्या सेवनप्रकरणी दिलेल्या नावांच्या यादीनुसार संबंधितांवर छापे टाकून पोलिसांनी कारवाई न केल्यास 31 जानेवारीला महिलांसह तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आनारोजीन लोबो यांनी मंगळवारी झालेल्या पोलिस अधिकारी व शिवसेना शिष्टमंडळाच्या संयुक्‍त बैठकीत दिला. 

ही बैठक गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली.  बैठकीत  पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, पोलिस निरीक्षक सुनील धनावडे तसेच शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुका प्रमुख रूपेश राऊळ, महिला तालुका संघटक रश्मी माळवदे, शहर प्रमुख शब्बीर मणियार, जि. प. सदस्य मायकल डिसोजा, न. प. सभापती सुरेंद्र बांदेकर, आरती मोरे, माजी पं. स. सदस्य अशोक दळवी, चंद्रकांत कासार, श्रृतिका दळवी, शिवानी पाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

शहरातील गांजा पार्टी प्रकरणातील गांजा पुरवणार्‍यांना अटक करा, या मागणीसाठी 23 जानेवारीची डेडलाईन श्रीमती लोबो यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार मंगळवारी लोबो यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस स्थानकात धडकणार होत्या. परंतु या प्रकरणी लक्ष घालण्याच्या दृष्टीने उपअधीक्षक  श्री.गवस यांनी पोलिस निरीक्षक श्री. धनावडे यांच्यासह स्वतः लोबो व त्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्यास आले व दिलेल्या नावे व ठिकाणांवर पोलिस छापे टाकून कारवाई करतील, असे आश्‍वासन दिले.  यातील धूम स्टाईल वाहनचालकांवर कडक कारवाईचे आश्‍वासन देत गांजा, अफू अथवा अंमली पदार्थांचे सेवन करून नये, नशा करून नये यासाठी शाळा, महाविद्यालयांतून प्रबोधन करण्याचे आश्‍वासन पोलिस अधिकार्‍यांनी दिले. तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी काही ठिकाणांवर अवैध व्यवसाय सुरू असल्याचे बैठकीत सांगितल्याने सर्वजन चक्रावले.