होमपेज › Konkan › आंबोलीत कारच्या धडकेत महिला गंभीर

आंबोलीत कारच्या धडकेत महिला गंभीर

Published On: Apr 28 2018 10:59PM | Last Updated: Apr 28 2018 10:52PMआंबोली : वार्ताहर

आंबोली बसस्थानकासमोर शुक्रवारी दुपारी 2.30 वा.च्या सुमारास झालेल्या अपघातात प्राथमिक आरोग्य केंद्रातील  कर्मचारी वनीता देशमुख (36) गंभीर जखमी झाल्या.वनीता देशमुख घरी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव अल्टो कारने त्यांना जोरदार धडक दिली.त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी सांवतवाडी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

कारच्या धडकेनंतर वनीता देशमुख सुमारे पंधरा ते वीस फूट फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्यास व पायाला गंभीर  दुखापत झाली असून त्यांना स्थानिकांच्या मदतीने आंबोली प्रा. आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.अधिक उपचारासाठी त्यांना सावंतवाडी येथे हलविण्यात आले.

अल्टो कारचालक विनोद तिवरेकर हा लग्‍न समारंभ आटोपून सावंतवाडीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.अधिक तपास आंबोली पोलिस करत आहेत. सलग चार दिवस सुट्टी आल्याने आंबोलीमार्गे गोवा व जिल्ह्यात पर्यटनासाठी जाणार्‍या पर्यटक आणि प्रवाशी यांची वर्दळ वाढल्याने लहान-मोठे अपघात येथे होत आहेत.सतत होणार्‍या अपघातांमुळे आंबोली जकातवाडी ते बाजारपेठ परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी गेली 3 ते 4 वर्ष स्थानिक नागरिकांमधून होत असून सा.बां.कडून त्याकडे  दुर्लक्ष केला जात आहे.