Wed, Jul 17, 2019 18:02होमपेज › Konkan › जमीन व्यवहारातून मुंबईतील महिलेचा माभळेत खून

जमीन व्यवहारातून मुंबईतील महिलेचा माभळेत खून

Published On: Jul 31 2018 2:01AM | Last Updated: Jul 31 2018 1:49AMरत्नागिरी : शहर वार्ताहर

मुंबईतून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह संगमेश्‍वरातील माभळे काष्टेवाडी सडा येथे चिरेखाणीत मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार असून, जमिनीच्या व्यवहारातून हा घातपात झाल्याचे तपासात उघड झाले आहे. स्मिता चंद्रशेखर कुसुरकर (वय 45, रा. लोअर परेल) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित श्रीकांत घडशी याला पोलिसांनी अटक केली आहे.

स्मिता या दि. 11 जुलै रोजी सकाळी 7.45 वाजता जमिनीच्या कामासाठी कोकणात जाते असे सांगून निघाल्या होत्या. 16 जुलैपर्यंत त्या परत न आल्याने तसेच त्यांचा मोबाईल बंद झाल्याने त्यांचे पती चंद्रशेखर यांनी 16 जुलै रोजी मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीत कोकणचा उल्लेख आल्याने ती तक्रार रत्नागिरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली.

गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक शिरीष सासणे व सहकार्‍यांनी जलद गतीने तपास सुरू करून मोबाईल लोकेशन तपासले. मोबाईलचे शेवटचे लोकेशन रत्नागिरी आढळले. त्यानंतर 11 ते 16 जुलै या काळात त्यांचे ज्यांच्याशी संभाषण झाले त्यांचे नंबर तपासण्यात आले. त्यात संगमेश्‍वरातील श्रीकांत घडशी आणि स्मिता यांचे शेवटचे संभाषण झाल्याचे उघड झाले. हा एकच धागा पकडून पोलिसांनी श्रीकांतला गाठण्याचा प्रयत्न केला. तो फरार असल्याचे समजताच पोलिसांनी त्यांचा मागोवा घेतला. रविवारी मुंबईत सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. श्रीकांतने स्मिता यांचा घातपात केला असून, मृतदेह माभळे काष्टेवाडी सडा येथे चिरेखाणीत टाकल्याचे पोलिसांना सांगितले. संशयित श्रीकांतला अटक करून पोलिसांनी मृतदेहाचा शोध सुरू केला. सोमवारी सायंकाळी उशिरा मृतदेह ताब्यात घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, श्रीकांत याने काही वर्षापूर्वी स्वत:च्या पत्नीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र पुरेशा पुराव्यांअभावी तो निर्दोष सुटला होता. 

उमरे गावातील जमीन खरेदीचा सुमारे 32 लाख रूपयांचा व्यवहार झाला होता. आरोपी श्रीकांत टोलू घडशी याने कुसूरकर यांना दि.12 जुलैला चिरेखाणीसाठी आवश्यक असलेल्या जमीन खरेदी व्यवहारासाठी बोलावले होते. हा व्यवहार पूर्ण न केल्याने कुसुरकर यांचा खून करण्यात आला. जमिनीची पाहणी सुरू असताना श्रीकांतने कुसूरकर यांना चिरेखाणीत ढकलून दिले. दगड, माती टाकून कुसूरकर यांना चिरेखाणीतून पूरुन टाकल्याची कबुली आरोपी श्रीकांत घडशी याने दिली. चिरेखाणीत पुरलेला मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर तो पती चंद्रशेखर कुसूरकर यांच्या ताब्यात देण्यात आला.