Sun, May 26, 2019 21:31होमपेज › Konkan › विनापरवाना पर्ससीन, एलईडी मासेमारीवर होणार कारवाई

विनापरवाना पर्ससीन, एलईडी मासेमारीवर होणार कारवाई

Published On: Aug 26 2018 1:28AM | Last Updated: Aug 25 2018 9:43PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पर्ससीन, मिनी पर्ससीन व एलईडीद्वारे अडीच हजार नौकांद्वारे सुरू असलेल्या मासेमारीला लगाम घालण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील अडीच हजार पर्ससीन नौकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व सागरी जिल्ह्यांच्या सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना तातडीने देण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधले यांनी दिले आहेत.

डॉ. सोमवंशी समितीच्या शिफासशी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 5 फेब्रुवारी 2016 रोजी पर्ससीन, रिंगसीन (मिनी पर्ससीन) मासेमारीवर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना असणारी अधिसूचना जारी करून अडीच वर्षे उलटली तरी मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाईचा फार्स केला नव्हता. गेले दोन हंगाम छोटे मच्छीमार हे पर्ससीनवर कधी कारवाई होते, याकडे लक्ष ठेवून होते. मात्र, काहीच हालचाली होत नसल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच अडीच हजार नौकांद्वारे चालू असलेली बेकायदा पर्ससीन मासेमारी तत्काळ बंद करावी म्हणून अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मागणी केली होती. त्याबाबत आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दि.23 ऑगस्ट 2018 रोजी तारापोर कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील अडीच हजार पर्ससीन नौकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आदेश राज्यातील सर्व सागरी जिल्ह्यांच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांना तातडीने देण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय (प्रशासकीय) युवराज चौगुले यांना दिले.

राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेतून बांधण्यात आलेल्या नौकांना पर्ससीन जाळ्याने मासेमारी करण्यास बंदी आहे. 5 फेब्रुवारी 2016च्या अधिसूचनेनुसार राज्यातील 494 पर्ससीन मासेमारी परवानेधारक नौकांना झाई ते मुरुड पर्ससीन मासेमारीस 12 महिने बंदी असून त्यांनी मुरुड ते बुरंडी 10 मीटर, बुरंडी ते जयगड 20 मीटर, जयगड ते बांदा 25 मीटर खोल पाण्यात 500 मीटर लांबी, 40 मीटर ऊंची, 25 मिलीमीटरपेक्षा कमी नसलेल्या आसाच्या पर्ससीन जाळ्याने मासेमारी करायची आहे. तसेच हायड्रॉलिक विंच (बूम)च्या साह्याने, भूल देऊन, रसायनाचा वापर करून मासळी पकडण्यासही बंदी आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने एलईडी लाईटचा वापर करून मासेमारी करण्यास बंदी घातली आहे.

दि. 5 फेब्रुवारी 2016 रोजीच्या शासन निर्णयाची कडक अंलबजावणी करण्याचा निर्णय मत्स्य व्यवसाय आयुक्त अरूण विधले यांनी घेतला आहे. विनापरवाना मासेमारी करणार्‍या पर्ससीन नौकांवर बंदरात कारवाई करून रोखले जाणार आणि परवानेधारक पर्ससीन नौकांवरील जाळे विहित आकारमानात नसेल अशा नौकांचे मासेमारी परवाने रद्द केले जाणार आहेत. 

या बैठकीत कृती समितीचे सरचिटणीस संजय कोळी, उपाध्यक्ष रवी म्हात्रे, चिटणीस मिल्टन सौदया, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष खलील वस्ता, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

परराज्यांतील नौकांवर राहणार करडी नजर

राज्यातील मत्स्य साठ्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी पर्ससीन मासेमारी नौकांची संख्या 182 वर आणण्यासाठी उपाययोजना राबवणार असून ज्या गोवा, कर्नाटक आदी परराज्यांतील नौका मासेमारी परवाने नसताना ए. एन. विशेष आर्थिक क्षेत्रात तसेच राज्याच्या जलधी क्षेत्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मासेमारी करणार्‍यांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने करडी नजर ठेवून कोस्ट गार्ड, सागरी पोलिसांमार्फत कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात येणार आहे.