होमपेज › Konkan › विजेच्या धक्क्याने पोलवरून पडून वायरमन ठार

विजेच्या धक्क्याने पोलवरून पडून वायरमन ठार

Published On: Jan 29 2018 11:22PM | Last Updated: Jan 29 2018 11:17PMकणकवली : प्रतिनिधी

तळेरे-वाघाचीवाडी येथे हायवेनजीक एका पोलवर दुरूस्तीचे काम करण्यासाठी चढलेल्या कृष्णा मसुराव मसके (28, बीड, सध्या रा. नांदगाव) याला विजेचा धक्का बसून तो पोलवरून खाली पडून जागीच ठार झाला. ही घटना सोमवार सायंकाळी चार ते सव्वाचारच्या सुमारास घडली.

तंत्रज्ञ म्हणून कायमस्वरूपी महावितरणच्या सेवेत असलेला कृष्णा मसके याने सोमवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत वसुलीचे काम केले. सायंकाळी तो आपल्या एका सहकार्‍यासमवेत तळेरे-वाघाचीवाडी येथे एका पोलवर दुरूस्तीचे काम करण्यासाठी गेला होता. त्या भागात खारेपाटण आणि नांदगाव अशा सबस्टेशनवरून वीज पुरवठा होतो. कृष्णा मसके याने नांदगाव सबस्टेशनला फोन करून वीज पुरवठा बंद करण्यास सांगितले. त्यामुळे वीज पुरवठा बंद आहे असे समजून तो पोलवर चढला. मात्र त्याचे दुैदैव असे की खारेपाटणरून येणारा वीजपुरवठा सुरू होता. तळेरे-वाघाचीवाडी येथे तो ज्या पोलवर चढला त्या पोलवर खारेपाटण सबस्टेशनचा वीजपुरवठा सुरू असल्याने त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला आणि तो छातीवर जमिनीवर कोसळला. त्यात त्याच्या छातीवर जोरदार मार बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याच्या सोबत असलेल्या दुसर्‍या वायरमनने तत्काळ कार्यालयात असलेले कनिष्ठ अभियंता मंदार काणकेकर यांना ही खबर दिली. त्यानंतर त्याला तळेरे  प्रा.आ. केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर मंदार काणकेकर यांनी दिली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास कासार्डे दूरक्षेत्राचे पोलिस करत आहेत.