Tue, Oct 22, 2019 01:38होमपेज › Konkan › गोवा बनावटीचा सात लाखांचा मद्यसाठा जप्‍त

गोवा बनावटीचा सात लाखांचा मद्यसाठा जप्‍त

Published On: Dec 30 2017 12:47AM | Last Updated: Dec 29 2017 10:34PM

बुकमार्क करा
सावर्डे : वार्ताहर

थर्टी फर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या रत्नागिरी विभागाने महामार्गावर ठिकठिकाणी गस्ती पथके तैनात केली आहेत. 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होण्याच्या शक्यतेने वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. फरशी तिठा (ता. चिपळूण) आणि कोंडमळा-सावर्डे (ता. चिपळूण) या ठिकाणी विभागाने केलेल्या तीन कारवायांमध्ये दोन मारुती व्हॅनसह एकूण 7 लाख 31 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

चिपळूण तालुक्यातील फरशी तिठा येथे गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईत संशयित राजेश प्रभाकर हरचिलकर याच्या गाडीतून गोल्डन एस. फाईन व्हिस्कीच्या 750 मि.ली. क्षमतेच्या 12 सीलबंद बाटल्या भरलेले बॉक्स अशा एकूण 50 बॉक्समधील 600 प्लास्टिक बाटल्या असा एकूण 3 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी केलेल्या दुसर्‍या कारवाईत व्हॅनचालक दीपक महादेव उत्तेकर (40, कुरवळ-जावळी, ता. खेड) याच्याकडून 17 हजार 500 रुपये किमतीची 350 मि.ली. क्षमतेची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत वाहनासह 1 लाख 95 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याचबरोबर कोंडमळा- सावर्डे येथे शुक्रवार सकाळी 9 वा. सुमारास सुनील सुभाष सावर्डेकर (30, रा. निवाचीवाडी, चिपळूण) यांच्या घराशेजारी गोवा मद्याची व गावठी हातभट्टी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने बसलेला होता. त्याला रंगेहाथ पकडून त्याच्या ताब्यातून 26 हजार 400 रूपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये 20 लिटरची गावठी हातभट्टी दारूने भरलेले 2 प्लास्टिक कॅन तसेच गोल्डन एस 750 मिली क्षमतेच्या 40 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या कारवाईत तीन संशयितांकडून 390 लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच 480 मिली गोवा बनावटीचे विदेशी मद्य तसेच दोन व्हॅनसह एकूण रूपये 7 लाख 31 हजार 900 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय उपआयुक्‍त संगीता दरेकर यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.