Sun, Jun 16, 2019 02:56होमपेज › Konkan › सावर्डेत साकारणार तारांगण

सावर्डेत साकारणार तारांगण

Published On: Jun 19 2018 10:47PM | Last Updated: Jun 19 2018 8:22PMसावर्डे : वार्ताहर

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माजी खासदार कै. गोविंदराव निकम स्मृतिस्थळाच्या ठिकाणी भव्य तारांगण साकारण्यात येणार आहे. ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली या तारांगणाची उभारणी केली जाणार असल्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी सांगितले. 

नुकतीच खगोल अभ्यासक सोमण यांनी सावर्डेला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील स्व. गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली व समाधीस्थळी एखादे भव्य तारांगण उभारावे, असा सल्ला कार्याध्यक्ष शेखर निकम यांना दिला. त्यांच्या या कल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी निकम यांनी पुढाकार घेतला असून समाधीस्थळाजवळ वस्तू संग्रहालय आहे. भव्य स्मारक आहे. शिवाय तेथील निसर्ग आल्हाददायक आहे. त्यात तारांगण उभे केल्यास या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढेल. शिवाय शैक्षणिक संकुल लगत असल्याने या तारांगणाचा विद्यार्थ्यांना देखील फायदा होईल. त्या माध्यमातून पर्यटकांची संख्यादेखील वाढेल. हे लक्षात घेऊन तारांगण उभे केले जाणार आहे. दा. कृ. सोमण यांच्या संकल्पनेतून ही उभारणी होणार असून त्याची जबाबदारी ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के व पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तांत्रिक जबाबदारी सह्याद्री पॉलिटेक्निक तर सजावटीची जबाबदारी सह्याद्री स्कूल  ऑफ आर्टने उचलली आहे.

या तारांगणामुळे जिल्हावासियांना अवकाशाविषयी माहिती मिळणार आहे. मुंबईतील ‘नेहरू तारांगण’च्या धर्तीवर ही उभारणी केली जाणार असून पिंपरी, चिंचवड, पुणे, अकोला, औरंगाबाद यानंतर सावर्डेसारख्या गावात याची उभारणी होणार आहे. अर्धगोलाकार चित्रपटगृहासारखी त्याची रचना असेल. यामुळे चिपळूण तालुक्यासह सावर्डेच्या वैभवात भर पडणार आहे. जवळच असलेली डेरवण शिवसृष्टी, सह्याद्री शिक्षण संस्थेचे शैक्षणिक संकूल, डेरवण येथील अद्ययावत स्टेडियम, मेडिकल कॉलेज यामुळे देशभरातील विद्यार्थी येथे येतात. त्यांच्याशिवाय कोकणसाठी हे तारांगण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

या संदर्भात कार्याध्यक्ष शेखर निकम यांना विचारले असता, ग्रहगोलाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असते. खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी तारांगणाची मदत होईल. त्यातून अवकाशाविषयी समज-गैरसमज दूर होतील. ग्रहण, धुमकेतू, उल्कापात याची माहिती होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अवकाशज्ञान होईल. यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.