Tue, Oct 22, 2019 02:31होमपेज › Konkan › आंबा बागेस वणवा; 7 लाखांची हानी 

आंबा बागेस वणवा; 7 लाखांची हानी 

Published On: May 21 2019 1:49AM | Last Updated: May 21 2019 1:49AM
राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील चिखलगाव येथील आंबा बागायतदार शेतकरी सुधाकर सुर्वे यांच्या हापूस कलम बागेला अचानकपण वणवा लागून सुमारे 100 ते 125 हापूसची कलमे, काजू व नारळाची झाडे जळून खाक झाली आहेत. यात सुर्वे यांचे सुमारे पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाकडून या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्यात आला आहे. 

सुधाकर सुर्वे यांची चिखलगाव येथे हापूस कलमांची बाग आहे. यामध्ये काजू व नारळाचीही लागवड करण्यात आली आहे. हापूसची कलमे दोन वर्षांपासून चांगली धरती झाली होती. यातून उत्पन्नही मिळू लागले होते. रविवारी सुर्वे यांच्या या बागेला अचानकपणे आग लागली. या आगीत सुमारे 100 ते 125 हापूसची फळ लागलेली कलमे, काही काजू कलमे व नारळाची झाडे जळून खाक झाली आहेत. बागेला वणवा लागल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी बागेत धाव घेत तो आटोक्यात आणला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. वणवा कशामुळे लागला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या आगीत सुर्वे यांचे सुमारे पाच ते सात लाखांचे नुकसान झाले आहे. 

या दुुर्घटनेत उत्पन्न देऊ लागलेली हापूसची कलमे जळून खाक झाल्याने सुर्वे यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ महसूल प्रशासनाला कळविण्यात आले असून महसूल प्रशासनाकडून आगीचा पंचनामा करण्यात आला आहे. अशा प्रकारे हापूस कलमांना आगी लागण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात तालुक्यात वारंवार घडत असून याचा फटका आंबा बागायतदारांना बसत आहे. 

पाच ते सात वर्षे आर्थिक भुर्दंड सहन करून मुलाप्रमाणे संगोपन केलेली हापूसची कलमे धरती झाल्यावर व त्यातून उत्पन्न मिळू लागल्यावर अशी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. त्यामुळे नाहक आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने अशा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 
 
 WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19