होमपेज › Konkan › जनतेची सर्वांगीण विकासाची अपेक्षा पूर्ण होणार का?

जनतेची सर्वांगीण विकासाची अपेक्षा पूर्ण होणार का?

Published On: Apr 23 2018 11:12PM | Last Updated: Apr 23 2018 10:40PMकणकवली:अक्षय पावसकर 

 कणकवलीकरांनी मोठ्या आशेने स्वाभिमान पक्षाचे शहराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे एक हाती सत्ता दिली.नवनिर्वाचित नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यापूर्वी उपनगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे.यामुळे प्रशासनाचा तसेच शहरातील समस्यांचा गाढा अभ्यास त्यांच्या जवळ आहे.त्या अनुभवाच्या जोरावर शहरातील प्रस्तावित आरक्षणे व अन्य विकास कामे मार्गी लावून शहराला एक नवी झळाळी द्यावी,अशी अपेक्षा येथील नागरिकांची आहे. 

 गेल्या 15 वर्षांत शहराच्या विकाचा विचार केला तर अनेक प्रश्‍न,समस्या आजही प्रलंबित आहेत.यात प्रामुख्याने सांडपाणी व वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. सांडपाणी निवारणासाठी भुयारी गटारांची योजना प्रस्तावित आहे. मात्र, योग्य नियोजन व निधी अभावी हे काम रखडले आहे.त्यामुळे जागो जागी सांडपाणी साठून दुर्गर्ंधी फैलावत आहे. शहराचा विकास करण्यासाठी क्रीडांगण,गार्डन,भाजी मार्केट,जलतरंग तलाव, स्विमिंग टँक,पार्किंग,बेघरांना घरे अशी  विविध 57 आरक्षणे आहेत. मात्र प्रशासनाच्या जाचक अटी व नियोजनाअभावी तसेच न.पं.च्या सत्तेचा उपभोग घेतलेल्या सर्वच पक्षाचा लोकप्रतिनिधींना पुरेसा निधी खेचून आणण्यात आलेल्या अपयशामुळे ही आरक्षणे विकसित होऊ शकली नाहीत.

शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून पार्किंग आरक्षण प्रस्तावित आहे. मात्र, न.पं.च्या निधी अभावी ते डेव्हलप होऊ शकले नाही. तसेच शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर एक दिशा मार्ग होऊनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. तसेच हॉकर्स झोन, फिरत्या विक्रेत्यांचे अतिक्रमण,सम-विषम न होणारे पार्किंग यामुळे वाहतूक कोंडीने नागरिक कायम त्रस्त असतात. मच्छीमार्केटमध्ये मटण विक्रेत्यांसाठीही गाळे बांधले गेले आहेत. मात्र  तांत्रिक अडचणीमुळे मटण विक्रेते अद्यापही मार्केटपासून दूर आहेत.मध्यंतरीच्या काळात समीर नलावडे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.मात्र, काही कारणामुळे हे शक्य झाले नाही. मात्र आता एक हाती सत्ता आल्याने नलावडे हे काम मार्गी लावतील,अशी आशा चिकन-मटण विक्रेत्यांची आहे. 

मोकाट गुरे,भटके कुत्रे यावरही न.प.कडून कोणतीही उपाययोजना झालेली नाही. शहरात स्वच्छेतेचा प्रश्‍नही गंभीर आहे. शासनाने स्वच्छता मोहिम राबवत शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला होता. याला शहरातील जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही ठिकाणी कचर्‍याचे ढिगारे दिसून येत आहेत. सुशोभीकरणातही  कणकवली शहर मागे आहे. वाडीवस्ती मधील अरुंद रस्ते, अंतर्गत पाय वाटा,भूमिगत विद्युत वाहिन्या,पथदीप, खुंटलेली बाजारपेठ, रस्त्यावर दिशा दर्शक फलक अशा विविध सोई-सुविधा पासून शहर वंचीत आहे. पुढील पाच वर्षांच्या  कालावधीत नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी ही कामे मार्गी लावून जनतेला अपेक्षित असलेला विकास करावा,अशी अपेक्षा निवडणुकीनंतर कणकवलीवासीयांनी व्यक्‍त केली आहे.