Sun, Jul 21, 2019 07:54होमपेज › Konkan › नारायण राणे यांच्या मंत्रिपदाचे काय?

नारायण राणे यांच्या मंत्रिपदाचे काय?

Published On: Feb 06 2018 11:04PM | Last Updated: Feb 06 2018 8:41PM
राजकीय विशेष : गणेश जेठे

नव्या वर्षातील जानेवारी महिन्यातच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्रातील युती सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात येणार असल्याची खात्री राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करणार’ असे जाहीर केल्याने प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा दावा केला होता. आता जानेवारी संपून फेब्रुवारी महिन्यातला पहिला आठवडा संपला तरी राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत राज्य पातळीवर हालचाली दिसत नाहीयेत. किंबहुना तशा हालचाली पूर्णपणे थंडावल्याचेच चित्र दिसते आहे. तरीही राणे मंत्री केव्हा होणार? याबाबत कोकणवासीयांमध्ये उत्सुकता आहेच. अर्थात याबाबत सत्तेत असलेल्या भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेले वर्षभर महाराष्ट्राच्या राजकारणात राणे यांचा न झालेला भाजप प्रवेश आणि त्यानंतर मंत्रिमंडळातील प्रवेशाची चर्चा सुरू आहे. या कालावधीत त्यांनी काँग्रेसमुक्‍त होऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा नवा पक्ष स्थापून वेगळी चूल मांडली. त्यानंतर पुढे पाऊल म्हणून केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये सामील होण्याचा निर्णय राणे यांनी जाहीर केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार अमित शहा यांनी राणे यांनी भाजप प्रवेशाऐवजी स्वतंत्र पक्ष स्थापून मग एनडीएमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसारच राणे यांनी तसा पक्ष स्थापन करून आपली राजकीय कारकीर्द सुरू ठेवली आहे. परंतु हा मंत्री पदाकडे जाण्याचा एक मार्ग होता असे राजकीय वर्तुळात मानले जात होते. सुरुवातीला राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आणि मग गुजरात निवडणुकीची रणधुमाळी संपली की राणे यांना मंत्रिमंडळात समावेशाचा निर्णय होईल, असा दावा वारंवार केला जात होता, परंतु तसेही घडले नाही.

डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल आणि ते पदही भाजपच्या कोट्यातून दिले जाईल, त्यामुळे शिवसेनेनेही नाराज होण्याचा प्रश्‍नच नाही असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. तरीदेखील तसे घडले नाही. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून यावे लागते, असा नियम आहे. परंतु त्यामुळेही काही फारसे अडत नाही. सहा महिन्यात आमदार होता नाही आले तरी आणि पुढील एक-दोन महिन्यात तशी संधी असली तर मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा लगेचच मंत्रीपदाची शपथ घेण्याची तरतूदही आहे. तरीही राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. 

आता लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे रणशिंग पुढील 2019 या वर्षी फुंकले जाणार आहे. लोकसभा निवडणूक एप्रिल-2019 मध्ये आणि विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात असे संकेत दिले आहेत. 

तसा निर्णय झाला तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाही वर्षभराने घ्याव्या लागतील. याचाच अर्थ आता निवडणुकांना एक ते दीड वर्ष शिल्लक राहिले आहे. अशा परिस्थितीत राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल का? असा एक प्रश्‍न उपस्थित केला जातो. आणखी उशीर झाला तर राणे मंत्रीपद स्वीकारतील का? असाही एक सवाल विचारला जात आहे.

खरंतर राणे यांना त्यांच्या स्वाभिमान या पक्षाची व्याप्ती वाढवायची आहे. कोकणात त्यांना अधिक संधी वाटते. त्यामुळेच राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि यातील सहा विधानसभा मतदारसंघ लढविण्याची तयारी करत आहेत. सभा, बैठकांचा जोर वाढला आहे. त्याचवेळी सत्तेचा फायदा घेत कोकणात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करणारा भाजप पक्ष राणे यांच्या पक्षाला जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसणार हे निश्‍चित आहे. 

असे असताना राणे यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी भाजपसमोर राजकीय अडचण असावी असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.राजापूर-नाणार येथील रिफायरनरी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी भाजपने सर्व ताकद उतरवली आहे. त्याचवेळी राणे यांनी मात्र या प्रकल्पाला विरोधाची भुमिका घेतली आहे. ही भुमिकासुध्दा राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाच्या आड येवू शकते असेही मत व्यक्त होत आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवसेनेला आताच्या घडीला बाजूला सारणे परवडणारे नाही. त्यामुळे शिवसेनेची नाराजी ओढवून घेण्याच्या मनस्थितीत भाजप नाही. परिणामी आणखी वर्षभर शिवसेनेच्या संगतीनेच राज्य कारभार करायचा आणि 2019 च्या निवडणूक संग्रामात मैदानात उतरायचे अशी भाजपची स्ट्रॅटेजी असू शकते. भाजपची पुढील राजकीय वाटचालीसाठी कोणती भूमिका असणार यावरच राणे यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश अवलंबून आहे. म्हणूनच भाजपच्या भूमिकेकडे कोकणचे लक्ष लागून राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील राणे यांच्या 27 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ते तब्बल 15 वर्षे मंत्री राहीले आहेत. सहा ते सात वर्षे विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले आहे. आता पुन्हा एकदा राणे मंत्री होतात का? याबाबत कोकणवासीयांना जशी उत्सुकता आहे तशीच पुढील वर्षभरानंतर येणार्‍या निवडणुकांमध्ये राणे काय भुमिका बजावणार याचीही उत्सुकता आहेच.