Mon, Jan 27, 2020 11:49होमपेज › Konkan › पश्‍चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणात

पश्‍चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणात

Published On: May 21 2019 1:49AM | Last Updated: May 20 2019 11:10PM
रत्नागिरी : प्रमोद करंडे

शिवारात चारा नाही, पाणी नाही, बागायती भागात  बसण्यास शेते नाहीत. यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील जनावरांचे हाल-हाल सुरू आहेत. कितीही आक्रोश केला तरी या जनावरांना छावणीचा आसरा देण्यास शासन, प्रशासन तयार नाही. निसर्ग, शासन व प्रशासन जणू यांच्या जीवावरच  उठल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे मेंढपाळांवर कोकणात जाण्याची वेळ आली आहे. असे मेंढपाळ सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागात दिसून येत आहेत.

सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धनगर बांधव आहेत. त्यांच्याकडे  लाखोंच्या घरात शेळ्या-मेंढ्यांचे पशुधन आहे. परंतु यंदा दुष्काळामुळे  फारच बिकट अवस्था झाली आहे. रब्बी आणि खरीप हंगामात पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या हाताला काहीच लागले नाही. त्यांच्याच जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांची जनावरे छावणीत  दाखल केली आहेत. त्यामुळे मेंढ्या शेतात बसविणे जवळपास बंदच झाले आहे.

तसेच मोकळ्या रानात चारा उपलब्ध नाही. डोंगरमाथे, पठारांवरील खुरटे गवत सुकून गेले आहे. पाणी नसल्याने झाडे-झुडपे वाळून गेली आहेत. खुरट्या झुडपांवर फक्त वाळलेल्या काटक्याच शिल्लक आहेत. पाण्याचे मोठे स्त्रोत आटले आहेत. गाव तलावातही पाण्याचा टिपूस नाही. तलावात पाणी सोडण्यास प्रशासन तयार नाही. माणसांना  पिण्यास पाणी देण्यासाठी प्रशासनाने विहिरी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे दिवसभर मेंढरे कुठे फिरवायची? त्यांना पाणी कोठून द्यायचे? असा प्रश्‍न मेंढपाळांना पडला आहे. 

विकत घेऊन परवडणारे नसल्याने शेळ्या-मेढ्यांच्या चारा, पाण्याचा प्रश्‍न बिकट होत चालला आहे. त्यातच वाढत्या  उन्हामुळे उष्माघातासह अनेक आजारांनी शेळ्या-मेंढ्यांना ग्रासले आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेक शेळ्या-मेंढ्या मृत्यूमुखी पडत आहेत. परिणामी मेंढ्या व मेंढपाळांना जगणे असह्य होऊ लागले आहे.

शेळ्या-मेंढ्या मरण्यापेक्षा त्या कवडीमोल दराने विकण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. परंतु शेळ्या-मेंढ्या विकून आणखी किती दिवस जगायचे? असा मोठा प्रश्‍न मेंढपाळांना पडला आहे. सर्वच शेळ्या-मेंढ्या विकाव्या लागू नयेत म्हणून काहींनी बागायती भाग व कोकणात स्थलांतर सुरू केले आहे. असे तांडेच्या-तांडे सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागात दिसत आहेत. कोकणातील वणव्यांचे प्रमाण वाढल्याने याचा काही प्रमाणात फटका या मेंढपाळांना बसत आहे. सह्याद्री पर्वतात लागणार्‍या वणव्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

बिबट्यांची भीती...

कोकणातील सह्याद्री पर्वताच्या पट्ट्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ सध्या शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी आणत आहेत. परंतु अलीकडच्या काही वर्षात कोकणात बिबट्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भर वस्तीत घुसून  बिबटे जनवारांवर हल्ले करतात. मेंढपाळ तर जंगलातच शेळ्या-मेंढ्यांसोबत राहतात. त्यामुळे कोकणात चारा, पाणी मिळत असले तरी बिबट्यांची भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया मेंढपाळांनी दिली.